मुंबई : भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी करुन तिथल्या लोकांना दहशतवाद्यांशी जोडण्याचे केलेले विखारी विधान हा संविधानातील सिद्धांतांवर थेट हल्लाच असून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या पदाच्या तत्वांशी केलेला हा विश्वासघात आहे. त्यामुळे भाजप नितेश राणेंच्या विखारी आणि विभाजनकारी वक्तव्यांचे समर्थन करते का?असा संतप्त सवाल करत, असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंची महायुती सरकारच्या नेत्यांनी थेट मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी आग्रही मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
नितेश राणे हे सातत्याने हिंदू मुस्लीम, पाकिस्तान अशी भाषा वापरून सतत एका समाजाला लक्ष्य करत आहेत. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यातच नितेश राणेंचा ‘बॉस’ ‘सागर’ बंगल्यावरून ‘वर्षा’वर गेल्यामुळे त्यांची हिंमत जरा जास्तच वाढलेली दिसते. परंतु मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नितेश राणे यांच्या विधानावर तातडीनं खुलासा करावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, मागणीचा पुनरुच्चारही खा. गायकवाड यांनी केला. मात्र त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी विभाजनकारी भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही एका निवडणूक प्रचारात वायनाडची तुलना पाकिस्तानशी केली होती. त्यामुळे अशा द्वेषपूर्ण विधानांच्या माध्यमातून भारताच्या सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणून असलेल्या अस्तित्वाचा विरोध केला जात असून विभाजनकारी राजकीय अजेंड्यासाठी भाजप सातत्याने संवैधानिक तत्त्वांची पायमल्ली करत आहे. भाजप-आरएसएसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कधी स्वीकरलेच नाही. तरीही हा देश संविधानानेच चालणार असून भाजप आणि संघाच्या विधानाने चालणारा नाही, अशा परखड शब्दात खा. गायकवाड यांनी सरकारला खडसावले.