मुंबई: अविरत रुग्णसेवेचे व्रत घेणारे केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. रुग्णांना जागेअभावी त्रास होऊ नये म्हणून आयुष्मान शताब्दी टॉवर उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, रुग्णालयात “झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी” लागू करण्याचे त्यांनी सूचित केले.
केईएम रुग्णालयाच्या शताब्दी महोत्सवी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयाच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया (१९६८) आणि टेस्ट ट्यूब बेबी (१९८७) या ठिकाणीच घडले. रुग्णालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत रोबोटिक सर्जरीसह अनेक वैद्यकीय क्रांती घडविल्या आहेत.
यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते फॅटी लिव्हरवरील उपचार केंद्राचे उद्घाटन झाले. ते या आजाराच्या जनजागृतीसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करतील.
कार्यक्रमात रुग्णालयाच्या स्मरणिकेचे आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे म्युझियम उभारण्याचेही सुचवले.
कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी उपस्थित होते.
आयुष्मान टॉवर आणि झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी रुग्णालयाच्या सेवेला नवे परिमाण देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.