पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा, अशी फडणवीस सरकारची योजना असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. प्रशांत कोरटकरला सुरक्षा देण्यात आली असतानाही तो पळून गेला, यामागे पोलिसांची फूस असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा राहुल सोलापूरकर सुरक्षित राहतो, पण त्याच्यावर कारवाई होत नाही. दुसरीकडे, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बलात्कार, हत्या, पोलिस कोठडीत मृत्यू, मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण अशा घटनांनी राज्य ढवळून निघाले आहे.
सपकाळ यांनी राज्याच्या गृहविभागावर टीका करत “महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?” असा सवाल उपस्थित केला. राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा, अशीही त्यांनी मागणी केली.
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाचा उल्लेख करताना त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेवरही टीका केली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.