मुंबई – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील १६० वाड्या आणि ३६ गावे गेल्या ५० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याला वंचित आहेत. या भागांना पाणी मिळण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील? असा रोखठोक आणि आक्रमक सवाल पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना उपस्थित केला.
यावर उत्तर देताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन हा प्रश्न जागेवरच सोडवू, असे आश्वासन दिले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले की, रायगड जिल्हा परिषदेमार्फत जल जीवन मिशन योजनेंतर्गत ३८ गावे आणि १०८ वाड्यांसाठी ५२०० वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यासाठी १९९.७८ लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. १०० किमी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, आणखी ५० किमीचे काम बाकी आहे.
रवीशेठ पाटील यांनी या भागांसाठी पाणीपुरवठा आराखडा तयार असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप केला. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याने हा प्रश्न सुटणार नाही, शासनाने तातडीने तो सोडवावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती.
या भागातील जुन्या पाइपलाइन सतत फुटत आहेत, जल जीवन मिशन योजनेतही पुरेसे पाणी उपलब्ध नाही, लोकांना जे पाणी मिळते ते दूषित असते, असे मुद्दे उपस्थित करून आमदार पाटील यांनी सरकारला जाब विचारला.
यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकाच बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.