डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन
मुंबई: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसने सोमवारी मुंबईत तीव्र आंदोलन छेडले.
आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर थेट मोर्चा आणला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
युवक काँग्रेसने एकाच वेळी नरीमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह आणि वर्षा बंगला या ठिकाणी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भाजपा महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, “डॉ. संपदा मुंडे यांना न्याय द्या!” अशी मागणी केली.

या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदन भानू चिब, प्रभारी मनीष शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, आणि प्रभारी अजय चिकारा यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
गिरगाव चौपाटी येथून सुरू झालेले हे आंदोलन थेट वर्षा बंगल्यापर्यंत पोहोचले.
आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत गिरगाव आणि मरीन ड्राईव्ह परिसरात बॅरिकेडिंग करून अनेक कार्यकर्त्यांना चर्नी रोड स्थानकात अडवले. तरीही आक्रमक कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ मरीन ड्राईव्हवर रास्ता रोको केला, ज्यामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली.
यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले, परंतु युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तन्वीर अहमद विद्रोही, लातूर जिल्हाध्यक्ष प्रविणकुमार बिराजदार, आणि नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मिथिलेश कान्हेरे यांनी पोलिसांना चकवून थेट वर्षा बंगल्यावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी पोलिसांनी सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
युवक काँग्रेसने या आंदोलनादरम्यान भाजपाच्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर थेट आरोप केला की, “डॉ. संपदा मुंडेंना माजी खासदार निंबाळकर आणि पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली.”
पोलिसांनी दोघांना अटक केली असली तरी मुख्य सूत्रधार निंबाळकर मोकाटच आहेत, असा आरोप काँग्रेसने केला.
“मुख्यमंत्र्यांनी तर चौकशीपूर्वीच निंबाळकरांना क्लिनचिट दिली आहे. हे प्रकरण सरकारकडून मुद्दाम दडपले जात आहे,”
असे युवक काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पूर्ण न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे काँग्रेसने सांगितले.
“सरकार चौकशीच्या नावाखाली मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण जोपर्यंत संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहील,” असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला.

