मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णायक डावपेच
मुंबई – भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांना प्रतिष्ठेचा प्रश्न बनवल्यानंतर अखेर मंगळवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता चव्हाण यांना त्यांच्या ‘घरच्या’ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या व्यूहरचनेला तोडीस तोड उत्तर देता येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महसूलमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही घोषणा खुद्द प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनीच केली.
बैठकीनंतर बावनकुळे म्हणाले, “महायुतीच्या माध्यमातून ५१ टक्के मते मिळवत आम्ही दोन-तृतीयांश बहुमताने महाराष्ट्रातील सर्व निवडणुका जिंकू. राज्यातील सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीचा प्रचंड विजय निश्चित आहे.”
मुंबईत मंगळवारी सकाळी झालेल्या या बैठकीस राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राज्यातील विविध भागातील संघटन मंत्री, महामंत्री तसेच मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुकांचे विभागनिहाय सादरीकरण करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रभाऱ्यांना महायुतीतील एकजूट टिकवण्याच्या, तसेच मित्रपक्षांवर टीका न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यानंतर बावनकुळे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
नियुक्तीनंतर बावनकुळे यांनी सांगितले की, “महायुतीत समन्वय टिकवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समिती स्थापन केली जाईल — एक भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीचे मंत्री समन्वयक म्हणून काम करतील. महायुतीत कुठेही मतभेद किंवा मनभेद निर्माण होणार नाहीत, याची पूर्ण काळजी भाजप घेईल.”

