नागपूर : राज्यात एफ.एल.–2 आणि सी.एल.–3 परवानाधारक विदेशी व देशी दारूची किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
आ. शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, “संबंधित दुकान जर सोसायटीच्या हद्दीत असेल, तर त्या सोसायटीची संमती नसताना स्थलांतरास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, एफ.एल.–2 (Foreign Liquor) आणि सी.एल.–3 (Country Liquor) या दोन्ही प्रकारच्या परवान्यांसाठी ही अट आता कडकपणे लागू राहील. पिंपरी–चिंचवडमधील कोळीवाडा आणि रहाटणी येथील दोन अनधिकृत दारू दुकाने निलंबित केल्याचेही त्यांनी सांगितले.
यापैकी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल. दुसऱ्या दुकानावर यापूर्वी ₹५०,००० दंड आकारण्यात आला असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

