महाड – महाडजवळील कोल गावातील प्राचीन बौद्धकालीन लेणी परिसरात यावर्षीचा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. पर्वत संवर्धन आणि मानवजातीशी पर्वतरांगांचे नाते अधोरेखित करणारा हा दिवस युनेस्कोच्या अन्न व कृषी विभागातर्फे जगभर साजरा केला जातो. यंदाचा जागतिक पर्वत दिन “जगाला शुद्ध पाणी, ऊर्जा आणि अन्न पुरवणाऱ्या हिमनद्यांचे संवर्धन” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित होता
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या उपक्रमांतर्गत सह्याद्री मित्रांच्या वतीने कोल लेण्यांमध्ये पर्वत पूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला कोल ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर किसन लोखंडे, रा.जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता शेठ, पत्रकार प्रसाद पाटील आणि स्थानिक कार्यकर्ते प्रफुल्ल धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
रा.जि.प. शाळा कोल आणि रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिरगाव शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सह्याद्री मित्र संस्था सदस्य, गिर्यारोहक आणि इतिहास अभ्यासक संकेत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना लेण्यांचा इतिहास, शिलालेखांचे वाचन, प्राचीन महाड बंदरातून होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार याबद्दल माहिती दिली.
सरपंच किशोर लोखंडे यांनी प्राचीन लेण्यांची दुरावस्था अधोरेखित करत पुरातत्त्व विभागाने तातडीने संवर्धन करावे अशी मागणी केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्थेतील डॉ. राहुल वारंगे, शलाका वारंगे, मोहन वडके, संकेत शिंदे, प्रसाद पाटील, शार्दुल वारंगे, संध्या मौर्य, डॉ. सोनिया नगरकर, मोहन नगरकर, मनिषा शेंडे, अर्णव शेट, मयुरेश मोरे, शोभा शेठ, सुलभा बागडे, रवींद्र बागडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कोल गावातील प्रफुल्ल धोंडगे, विनायक मोहिते, आकाश पवार, विजय धोंडगे, मंथन बाटे, प्रथमेश दोरकर यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाला सिस्केप संस्थेचे अध्यक्ष व पक्षी अभ्यासक सागर मेस्त्री, पर्यावरण कार्यकर्ते गणेश खातू, ज्येष्ठ रंगकर्मी सुधीर शेठ, सामाजिक कार्यकर्ते मयूर देवरुखकर यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या नियोजनात रायगड जिल्हा महा वारसा समिती सदस्य व पुरातत्त्व संशोधक सागर मुंढे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. शेवटी, युवा नेते प्रफुल्ल धोंडगे यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

