नागपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरच महायुती सरकारची वाटचाल सुरू राहील, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडली. एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेल्या संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही चंद्र–सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राची राजधानीच राहील, अशी ठाम ग्वाही त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असून गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. रस्ते विकास, सिंचन क्षमता, सौरऊर्जा, सायबर सुरक्षा आणि गुन्हे निराकरण या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्र आघाडीवर आहे. 2035 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एक तास सहा मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा आकडेवारीसह परामर्श घेतला. ते म्हणाले, “विरोधकांनी प्रत्येक विषयाचे राजकारण करू नये. आपल्या काळात विदर्भाला काय दिले, याची आकडेवारी दिली तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.”
विकासासाठी कर्ज घेणे अपरिहार्य असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, राज्याचे कर्ज सर्व निकषांमध्ये मर्यादेत असून कॅगच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत.
गुंतवणूक, रोजगार आणि ऊर्जा यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दावोस करारांपैकी 75% गुंतवणूक प्रत्यक्षात आली, गडचिरोली जिल्ह्यात सोलर मॉडेलमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहील, मिहान प्रकल्पातून 1.27 लाख रोजगार निर्माण झाले आहेत, गेल्या तीन वर्षांत 1.20 लाख सरकारी भरती करण्यात आली. आशिया खंडातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात असून गेल्या दोन वर्षांत राज्याला ऊर्जा क्षेत्रात 21 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
ते म्हणाले, राज्याच्या 82 हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीपैकी 36 हजार मेगावॅट हरित ऊर्जा असेल. एक लाख पंप स्टोरेज प्रकल्पांचे करार होणार असून, त्यामुळे दरवर्षी वीजदर 2% ने कमी होतील, असा दावाही त्यांनी केला.
सिंचन, दुष्काळ आणि पायाभूत सुविधा यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सिंचन क्षमतेत अव्वल कामगिरीबद्दल केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. गोदावरी खोऱ्यात 55 टीएमसी पाणी आणल्याने मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. पूराचे 30 टीएमसी पाणी वळवता येणार आहे, त्यामुळे दुष्काळ भूतकाळ ठरेल. नागपूर–गोवा शक्तीपीठ मार्ग दुष्काळी भागांचे चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्री म्हणाले, 36 हजार कोटींच्या गुंतवणुकीने मुंबई–कल्याण – लातूर – हैद्राबाद महामार्ग बांधला जाणार आहे, यामुळे, मुंबईहून लातूर अवघ्या साडेचार तासांत पोहोचता येईल.
गृहमंत्री या नात्याने बोलताना फडणवीस म्हणाले की, नव्या तीन कायद्यांमुळे दोषसिद्धीचे प्रमाण 96.24% झाले आहे. अपहरण प्रकरणांत 99% प्रकरणे शोधून सोडवली गेली आहेत. महासायबर हे देशातील सर्वात मोठे केंद्र महाराष्ट्रात असून, काही राज्ये व दोन देशांनी त्याबाबत सहकार्याची मागणी केली आहे. त्यापैकी एका देशाशी आज करार होत आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे जाळे लवकरच 132 किलोमीटरपर्यंत विस्तारेल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात “अब आगे बढ़ चुका हूं, जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं” हा शेर उद्धृत करत सभागृहात हलकेफुलके वातावरण निर्माण केले. यावेळी विरोधकांनीही दाद दिली.
विरोधक नेहमी ‘राईट टू रिप्लाय’ वापरून सभात्याग करतात; मात्र आज तसे घडले नाही, हेही विशेष ठरले.

