महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nawab Malik: तब्बल साडेतीन वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्यांची दणक्यात ‘एंट्री’!

कोणावर धडाडणार ‘मुलुख मैदानी तोफ’ याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना ज्यांच्यावर पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तीच ‘मुलुख मैदानी तोफ’ तब्बल साडेतीन वर्षांच्या विश्रांतीनंतर उद्या, शुक्रवारी, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा धडाडणार आहे. त्यामुळे उद्या ही तोफ नेमकी कोणावर रोखली जाणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्व पत्रकारांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची ही ‘तोफ’ म्हणजे माजी मंत्री नवाब मलिक. पत्रकार वर्तुळात ‘भाई’ या आदरार्थी नावाने ओळखले जाणारे नवाब मलिक हे आपल्या बेधडक, थेट आणि आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. एखादी पत्रकार परिषद म्हणजे आज कोणाची विकेट पडणार आणि कोण शब्दांच्या माऱ्याने घायाळ होणार, याची उत्सुकता कायमच पत्रकारांमध्ये असायची.

सध्या नवाब मलिक हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी जास्त न बोलण्याचा सल्ला दिल्याने, गेल्या साडेतीन वर्षांपासून मलिक सार्वजनिक राजकीय व्यासपीठांपासून दूर होते.

महानगरपालिका रणधुमाळीत मलिकांची ‘कमबॅक एंट्री’

सध्या राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. महायुती सरकारमध्ये सहभागी असतानाही, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नवाब मलिक सक्रिय असतील, तर भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, अशी ताठर भूमिका भाजपच्या मुंबईतील नेत्यांनी घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, एकीकडे शिंदे-भाजप महायुती, दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती, तर तिसऱ्या बाजूला काँग्रेस, सपा, एमआयएम आदी पक्षांच्या विरोधात राष्ट्रवादीने सर्वच जागांवर उमेदवार देत थेट लढत स्वीकारली आहे.

फडणवीस–मलिक संघर्षाची आठवण ताजी

२०१४ साली शिवसेना–भाजप युतीच्या सत्ताकाळात नवाब मलिक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वावर पुराव्यानिशी थेट आरोप करत राजकारण ढवळून काढले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्यांनी मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप विधिमंडळात उचलून धरले.

त्यावर मलिक यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीवर पुराव्यानिशी आरोप करत भाजपला जेरीस आणले होते. पुढे भाजपच्या प्रचारात “नवाब मलिक नकोत” ही भूमिका ठळकपणे मांडण्यात आली होती.

उद्या कोण ‘टार्गेट’वर?

अशा पार्श्वभूमीवर, शुक्रवारी होणाऱ्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नवाब मलिक नेमके कोणावर निशाणा साधणार, आणि कोण त्यांच्या शाब्दिक बाणांचा शिकार होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेची अधिकृत घोषणा करताच, सर्वाधिक धसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेतृत्वाने घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. तर दुसरीकडे, ‘भाई’ पुन्हा पत्रकार परिषद घेणार या बातमीनेच पत्रकारांमध्येही प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे.

एक मात्र निश्चित — उद्या राजकीय वातावरण तापणार आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात