महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील “मिसिंग लिंक”चे काम लवकरात लवकर पूर्ण करा…!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तातडीचे निर्देश

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील बोरघाटात मंगळवारी सायंकाळी ज्वलनशील गॅस वाहतूक करणारा एक अवजड टँकर अचानक तोल जाऊन पलटी झाला. या अपघातामुळे तब्बल २२ तासांहून अधिक काळ भीषण वाहतूक कोंडी झाली. या गंभीर घटनेची दखल घेत बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

यावेळी मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी “मिसिंग लिंक” या पर्यायी मार्गाच्या कामाला तातडीने गती देण्याचे सक्त आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच, अशा प्रकारच्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक व प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गासाठी स्वतंत्र आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एमएसआरडीसी तसेच पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, गॅस टँकर पलटी झाल्यानंतर ज्वलनशील प्रोपिलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या घटनेत वाहतूक कोंडीत अडकलेल्या आठ प्रवाशांना लोणावळा येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गॅस गळतीमुळे धोका अधिक वाढून मोठी दुर्घटना घडू शकली असती, त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करणे अपरिहार्य ठरले.

या कारणामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई–पुणे महामार्गाकडे वळविण्यात आली. एमएसआरडीसी व पोलीस प्रशासनाने सलग सुमारे २० तास अथक प्रयत्न करून गॅस गळती रोखली, अशी माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, प्रवाशांना झालेला त्रास अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यांच्या मनस्तापाची त्यांना पूर्ण जाणीव आहे.

एमएसआरडीसीने तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) मदत मागवली होती. त्यांच्यासह भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स या कंपन्यांच्या तज्ज्ञ पथकांनाही पाचारण करण्यात आले. या तज्ज्ञांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना एमएसआरडीसीकडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण करण्यात आले. सर्व अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत होते. याशिवाय, या कालावधीत पथकर वसुली करण्यात येऊ नये, असे निर्देशही आपण दिल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली स्थगित ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई–पुणे “मिसिंग लिंक” प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, ते लवकरात लवकर पूर्ण करून हा मार्ग सुरू करण्यात आल्यास मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ व अंतर दोन्ही कमी होईल. तसेच भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीत हा मार्ग प्रभावी पर्यायी वाहतूक मार्ग म्हणून उपयोगात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

या संदर्भात आपण स्वतः एमएसआरडीसी व पोलीस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून व्यापक आपत्कालीन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात