महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यात 11 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

Farmers in Marathwada standing in rain-damaged fields after unseasonal rain and hailstorm affecting crops

मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ११ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील फळपीके बाधित झाल्याची नोंद शासन स्तरावर करण्यात आली आहे. पुढील चार दिवसही पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अलीकडील गारपीट आणि वादळी पावसामुळे हाताला आलेली पिके आडवी झाली असून, शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी होत आहे.

जिल्हानिहाय नुकसानाचा तपशील

अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांना फटका बसला आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार:

  • छत्रपती संभाजीनगर: 8455.78 हेक्टर
  • जालना: 1364.20 हेक्टर
  • धाराशिव: 1509 हेक्टर
  • नांदेड: 34.25 हेक्टर
  • बीड: 156 हेक्टर
  • लातूर: 52 हेक्टर

एकूण नुकसान: 11572.13 हेक्टर

या आकडेवारीत पुढील काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जीवितहानी व जनावरांचे नुकसान

या अवकाळी पावसामुळे दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.

  • हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा येथील गुलाब मारकड (वय 33)
  • नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शिळवणी येथील दीपिका राठोड (वय 16)

विजेचा धक्का बसून या दोघांचा मृत्यू झाला.

तसेच, 16 मार्चपासून आतापर्यंत 41 जनावरे दगावली असून जिल्हानिहाय आकडेवारी अशी :

  • नांदेड – 14
  • लातूर – 9
  • धाराशिव – 6
  • जालना – 4
  • बीड – 4
  • परभणी – 2
  • हिंगोली – 1
  • संभाजीनगर – 1

पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • गहू, हरभरा आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला
  • केळी, आंबा आणि फळबागांचे नुकसान विशेषतः जास्त
  • वादळी वाऱ्यामुळे आंब्याची फळगळ झाली

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. काही ठिकाणी तर निसर्गाच्या या तडाख्यामुळे “तोंडचा घास हिरावला” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अवकाळी पावसाचा पुढील अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा अवकाळी पाऊस पडत असल्याचे सांगितले जात आहे.

नुकसानभरपाईची मागणी

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. तात्काळ पंचनामे करावेत आणि फळबागांसाठी जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

निसर्गाचा फटका आणि वाढती चिंता

गेल्या आठवड्यात मराठवाड्यात तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली असली, तरी अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची धावपळ उडाली. शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा सामना करावा लागत असल्याने आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. आधीच आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले असताना, या नव्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या चक्रात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचे वातावरण असावे, अशी अपेक्षा असताना यंदा मात्र हा सण अनेक शेतकऱ्यांसाठी चिंता आणि दुःख घेऊन आला.

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandge) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे. Dr Abhaykumar Dandge — writer and analyst on Marathwada’s agriculture, rural economy and regional politics

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात