महाड: महाड येथील होप फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र महाडीक यांची पाचव्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. हे संमेलन २२ ते २४ मे २०२६ दरम्यान पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
‘माझी शाळा माझा फळा’ या समूहाच्या वतीने आयोजित या संमेलनात स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे राज्यभरातील सुलेखनकार, फलक लेखनकार, रांगोळीकार आणि चित्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या निवडीबद्दल नरेंद्र महाडीक यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. या निमित्ताने बोलताना त्यांनी संयोजकांनी दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत कला, साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
अक्षरशिल्प हॅन्डरायटिंग अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर ‘अक्षर चळवळ’ उभी केली असून, आतापर्यंत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. यापूर्वी त्यांना कोल्हापूर येथे झालेल्या तिसऱ्या अक्षर संमेलनात ‘अक्षर गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

