महाड : मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पनवेलहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली असून एसटी बस हाउसफुल धावत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत विनापरवाना खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची उघड लूट सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
पनवेल ते महाड प्रवासासाठी प्रति प्रवासी ₹500 ते ₹700 पर्यंत दर आकारले जात असून, अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक केली जात आहे. या वाहन चालकांकडे आवश्यक परवाने नसतानाही बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे.
पनवेल बसस्थानकावर तासन्तास प्रतीक्षा करूनही एसटी मिळत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. सुट्टीच्या काळात एसटी महामंडळाकडून अतिरिक्त गाड्यांचे नियोजन अपुरे पडत असल्याने नागरिकांना पर्याय म्हणून खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
पनवेल आणि महाड आगाराबाहेर खाजगी वाहनांचा अक्षरशः तळ ठोकलेला असून “लवकर पोहोच” आणि “आरामदायी प्रवास” अशा आमिषांनी प्रवाशांना आकर्षित करून अवाच्या सव्वा दर आकारले जात आहेत.
याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक चालक रात्रभर वाहन चालवून थकलेल्या अवस्थेत पुन्हा वाहन चालवत असल्याचे दिसून येते. वेगमर्यादा न पाळणे आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
परिवहन विभागाकडून कारवाई होत असली तरी संघटनांचा दबाव आणि शिथिल अंमलबजावणीमुळे ही बेकायदेशीर वाहतूक सुरूच असल्याचे दिसते. नागरिकांनी यावर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

