महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहातून सर्वसामान्यांसाठी पाण्याचा हक्क मिळवून दिलेल्या महाडातील चवदार तळे परिसरात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांच्या पत्नीच्या नावे चवदार तळ्यापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर परमिट रूम आणि बिअर बार सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आल्याने आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महाड नगर परिषदेकडून यासंदर्भात हरकती मागविण्यात आल्यानंतर विविध सामाजिक संघटना, स्थानिक रहिवासी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संबंधित प्रस्तावाला परवानगी देऊ नये, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काही संघटनांनी दिला आहे.
महाड शहरातील ऐतिहासिक चवदार तळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी २० मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रह दिन, १४ एप्रिल आंबेडकर जयंती, ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आणि २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिनानिमित्त येथे हजारो अनुयायी एकत्र येतात. देश-विदेशातून पर्यटकही या ऐतिहासिक स्थळाला भेट देतात.

अशा संवेदनशील परिसरात बिअर बार आणि परमिट रूम सुरू करण्याचा प्रस्ताव आल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रस्तावित जागेवर पंधरा दिवसांपूर्वीच बिअर शॉपी सुरू करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महाड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा जोशी, राजेंद्र जोशी तसेच स्थानिक रहिवासी संघटनांनी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे लेखी हरकती दाखल केल्या आहेत. चवदार तळे परिसरात अशा प्रकारच्या व्यवसायाला परवानगी देणे ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाड नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर नोटिशीनुसार नागरिकांना सात दिवसांच्या आत हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र अंतिम निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीवर अवलंबून असल्याने आता लक्ष त्या विभागाच्या भूमिकेकडे लागले आहे.
दरम्यान, चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला असून, पुढील काही दिवसांत यावरून मोठा सामाजिक आणि राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

