साडेचार वर्षांत १.२७ कोटी बेडशीट, ब्लँकेट, टॉवेल, उशा व उशींची कव्हर्स गायब; २०२२च्या तुलनेत २०२५मध्ये चोरीत ५६% वाढ
मुंबई: प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले जाणारे बेडरोल साहित्य आता भारतीय रेल्वेसाठी मोठी आर्थिक डोकेदुखी ठरत आहे. माहिती अधिकार (RTI) अंतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२२ ते मे २०२६ या साडेचार वर्षांच्या कालावधीत एसी डब्यांतून तब्बल १.२७ कोटी बेडशीट, ब्लँकेट, टॉवेल, उशा आणि उशींची कव्हर्स गायब झाली आहेत.
विशेष म्हणजे, २०२२च्या तुलनेत २०२५मध्ये अशा घटनांमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि प्रवाशांच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रेल्वेच्या १८ झोनपैकी १६ झोनमधील ५४ विभागांकडून माहिती अधिकाराखाली प्राप्त झालेल्या उत्तरांतून ही माहिती समोर आली आहे.
दररोज सुमारे आठ लाख एसी प्रवाशांना दोन बेडशीट, एक ब्लँकेट, एक उशी, एक उशीचे कव्हर आणि एक टॉवेल अशी बेडरोल सुविधा पुरविली जाते. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार, प्रत्येक हजार एसी प्रवाशांमागे किमान एक प्रवासी बेडरोलमधील एखादी वस्तू सोबत घेऊन जातो.
ही केवळ किरकोळ चोरी नसून रेल्वेच्या महसुलावर आणि सार्वजनिक निधीवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी बाब असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी लाखो बेडरोल वस्तूंची नव्याने खरेदी करावी लागत असल्याने रेल्वेचा खर्च वाढत असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सार्वजनिक निधीवर होतो.
विभागनिहाय आकडेवारीतही चिंताजनक चित्र दिसून आले आहे. बिकानेर विभागातून सर्वाधिक बेडशीट, दिल्ली विभागातून सर्वाधिक टॉवेल, सोनपूर विभागातून सर्वाधिक उशींची कव्हर्स, तर जोधपूर विभागातून सर्वाधिक ब्लँकेट गायब झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे रेल्वे प्रशासनासमोर प्रवासी सुविधा टिकवून ठेवण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ठळक आकडे
कालावधी: जानेवारी २०२२ – मे २०२६
- एकूण गायब झालेले बेडरोल साहित्य : १.२७ कोटी
- २०२२च्या तुलनेत २०२५मध्ये वाढ : ५६%
- दररोज एसी प्रवासी : सुमारे ८ लाख
- प्रत्येक प्रवाशाला मिळणारी सुविधा :
- २ बेडशीट
- १ ब्लँकेट
- १ उशी
- १ उशीचे कव्हर
- १ टॉवेल
सर्वाधिक गायब झालेले साहित्य
- बेडशीट: बिकानेर विभाग
- टॉवेल: दिल्ली विभाग
- उशीचे कव्हर: सोनपूर विभाग
- ब्लँकेट: जोधपूर विभाग
‘मोफत’ नव्हे; करदात्यांच्या पैशातून उपलब्ध होणारी सुविधा
रेल्वेच्या एसी तिकिटासोबत मिळणारे बेडशीट, ब्लँकेट, टॉवेल किंवा उशी हे प्रवाशांना कायमस्वरूपी दिलेले साहित्य नसून, ते केवळ प्रवासादरम्यान वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलेली सार्वजनिक सुविधा आहे.
या वस्तू गायब झाल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर त्यांची पुन्हा खरेदी करण्यासाठी रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. परिणामी, सार्वजनिक निधीवर ताण वाढतो आणि त्याचा अप्रत्यक्ष आर्थिक भार सर्व करदात्यांवर येतो.
ही आकडेवारी सार्वजनिक मालमत्तेची जपणूक ही केवळ रेल्वे प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक प्रवाशाचीही सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव करून देते.

