सुनील तटकरेंवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर; रायगडमध्ये महायुतीतील वाद पुन्हा चर्चेत
milind mane
महाड : रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी प्रत्युत्तर देत, “महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम दळवींनी थांबवावे,” असा सल्ला दिला आहे. दळवी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यात सुनील तटकरे यांनी आता मार्गदर्शनाच्या भूमिकेत यावे आणि त्यांचे नेतृत्व लोकांना मान्य नसल्याचा दावा केला होता. यापूर्वीही रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये परस्पर टीका-प्रत्युत्तरांची मालिका सुरू आहे. देशमुख म्हणाले की, रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यासह महायुतीतील विविध नेते जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांवर एकत्र काम करताना दिसत आहेत. अलीकडील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही अनेक नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते, असे त्यांनी नमूद केले.
खालापूरच्या रोजगार प्रश्नाचाही उल्लेख
खालापूरमधील एका कंपनीतील रोजगाराच्या प्रश्नावर आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सामंजस्याची भूमिका घेत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समान संधी मिळावी, असा प्रयत्न केल्याचा उल्लेख देशमुख यांनी केला. या पार्श्वभूमीवर दळवी यांची तटकरे यांच्यावरील टीका अनावश्यक असल्याचे देशमुख यांनी म्हटले. दळवी यांनी तटकरे यांच्या वयाचा आणि नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यावर देशमुख यांनी त्यावरही आक्षेप घेतला. “सुनील तटकरे अनेक दशकांपासून निवडणूक आणि संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा अशा विविध स्तरांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे केवळ वयाचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणे योग्य नाही,” अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.
‘प्रसिद्धीसाठी टीका’ — देशमुखांचा आरोप
दळवी हे राजकीयदृष्ट्या एकटे पडल्याची भावना निर्माण झाल्यामुळे तटकरे यांच्यावर टीका करत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. महायुतीमध्ये मतभेद असले तरी सार्वजनिक वक्तव्यांमुळे अंतर्गत संघर्ष वाढू नये, अशी भूमिका राष्ट्रवादीकडून मांडली जात असल्याचे देशमुख यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. रायगडमध्ये गेल्या काही महिन्यांत महेंद्र दळवी आणि तटकरे कुटुंबीयांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. दळवी यांनी यापूर्वीही राष्ट्रवादी आणि तटकरे कुटुंबीयांवर टीका केली होती, तर अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले होते.

