विश्लेषण

सुनील तटकरेंची लोकसभा निवडणुकीतून माघार ?

Twitter : @milindmane70

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून अजित पवार गटातील दहा मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी त्यांच्या कन्येसाठी कोकणातील पालघर , ठाणे , रायगड व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील आठ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे. मात्र, एकीकडे तटकरे पिता- कन्येचा ‘तटकरे पॅटर्न’ (Tatkare pattern) रायगड लोकसभा मतदारसंघात डबघाईला आला असताना उर्वरित सात लोकसभा मतदारसंघात आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना हे धनुष्यबाण पेलवण्याऐवजी  ‘तटकरे पॅटर्न’ फुसका बार तर ठरणार नाही ना? अशी खुद्द राष्ट्रवादीसह अन्य पक्षांत चर्चिली जात आहे. कार्यकर्ते साथ सोडून गेले, जून मित्र पक्ष सोबत राहीले नाहीत, अशा परिस्थितीत खुद्द सुनील तटकरे पुन्हा लोकसभा निवडणूक लढवतील की त्यांनी माघार घेतली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महामार्गासह रेल्वे समस्यांकडे दुर्लक्ष

रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Lok Sabha constituency) निवडून आलेलल्या सुनील तटकरे यांनी कोणते प्रश्न सोडविले, असा प्रश्न जनता तटकरे यांना विचारत आहे. मतदारसंघातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचा भिजत पडलेला प्रश्न, वाढती बेरोजगारी, मच्छीमार बांधवांचा मासेमारी बाबतचा प्रश्न, कोकण रेल्वे स्थानकावरील रोहा सोडल्यास नागोठणे, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, करंजाडी, वामने सापे, विनेरे, दिवाणखवटी, खेड या रेल्वेस्थानकांचा मूलभूत सुविधांचा प्रश्न, रेल्वे प्रवाशांचे प्रलंबित प्रश्न, या स्थानकांवर मेल, एक्सप्रेसना थांबा देणे, पनवेल ते चिपळूणपर्यंत रेल्वे गाडी वाढवण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे मागणी अथवा चर्चा न करणे, असे अनेक प्रश्न तटकरे यांनी साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत का सोडविले नाहीत? असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.

सुनील तटकरे त्यांचे परंपरागत विरोधक अनंत गीते यांचा सामना करणार की माघार घेणार?

सुनील तटकरे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत?

सुरुवातीच्या दीड वर्षाचा काळात त्यांनी लोकसभा गाजवली, तेव्हा येथील जनतेला वाटले की गीतेंपेक्षा तटकरे बरे, परंतु त्यानंतर कोविडचा काळ बघता त्यांचे मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. गेल्या तीन वर्षात त्यांचे मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मुलगा आमदार, मुलगी मंत्री असे असतानाही श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सोडल्यास तटकरे परिवाराची पॉवर कमी होत चालली आहे. पूर्वीचा मित्रपक्ष असणारे शेतकरी कामगार पक्ष आता तटकरेंपासून लांब गेला आहे. तर सेनेमध्ये दोन गट पडल्याने सेनेचा कोणता मतदार आपल्याला पूर्वीसारखी मदत करेल याची शाश्वती देखील तटकरे यांना राहिलेली नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तटकरे कुटुंबाला घरातच सत्तेची फळे चाखायला दिली. मात्र तटकरे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांची साथ दिल्याने राष्ट्रवादीचा तळागाळातील सर्वसामान्य मतदार तटकरेंवर कमालीचा नाराज आहे. या मतदारसंघात पुन्हा निवडून येणे अवघड असल्याची जाणीव दस्तर खुद्द सुनील तटकरे यांना झाली आहे. मात्र, ही गोष्ट बोलायची कोणाकडे व ते सांगून आपली अडचण सोडवणारे सर्वच मित्र पक्ष त्यांच्यापासून दुरावले आहेत. कारण वेळेनुसार सोयीचे राजकारण करण्याचे धोरण तटकरे यांनी मागील काही वर्षात अवलंबल्याने त्याचा फटका तटकरे यांना संभाव्य निवडणुकीत बसू शकेल. त्यामुळे की काय खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहे.

तटकरेंना मत म्हणजे भाजपाला मत?

रायगड लोकसभा मतदारसंघातील गुहागर, दापोली, महाड, श्रीवर्धन, पेण, अलिबाग या सहा विधानसभा मतदारसंघातील पूर्वी तटकरेंबरोबर असणारा मुस्लिम समाज आता त्यांच्यासोबत नाही. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाल्याने मुस्लिम समाज तटकरे यांच्यापासूनही दुरावला आहे. तटकरेंना मत म्हणजे भाजपाला मत अशी चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघात तब्बल दोन लाखाच्या वर मुस्लिम समाजाचे मतदार आहेत. कुणबी समाजाची मते देखील दोन लाखाच्या आसपास आहेत. या सर्व मतांचा फटका तटकरेंना बसणार असल्याने त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्याची चाचपणी सुरु केली आहे.

file picture स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक प्रचारात अनिकेत तटकरे यांनी नारायण राणे यांची घेतली होती भेट

तटकरेंचे वर्चस्व कमी होणार?

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत तोच कित्ता गिरवण्याचे काम मागील पाच वर्षात केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठका सोडल्यास व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सोडल्यास त्या पलीकडे अनिकेत तटकरे यांनी कधीही मतदारांच्या व ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी व पंचायत समिती सभापतींनी व नगर परिषदेच्या नगरसेवकांनी त्यांना मत दिली, त्यांच्या समस्या कधी सोडवल्या नाहीत. त्या जाणून घेण्याचादेखील त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्यासाठी अनिकेत तटकरे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नारायण राणे व रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष व भाजपाचे प्रशांत ठाकूर यांची साथ मिळण्याची शक्यता नाही. तसेच या मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपाचे प्रमोद जठार व राजन तेली हे माजी आमदार ही निवडणूक लढवण्यासाठी पूर्वीपासूनच इच्छुक आहेत.

श्रीवर्धनमध्ये कडवी झुंज द्यावी लागेल?

सुनील तटकरे यांना श्रीवर्धन या त्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात विधासभा मतदार संघातून 38 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. आता तो मतदारदेखील तटकरेंसोबत राहिला नाही. या विधानसभा मतदारसंघात 97 हजाराच्या आसपास मुस्लिम तर 60 ते 65 हजाराच्या आसपास कुणबी मतदार आहेत. या मतदारांच्या जीवावरच तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राखून होते. मात्र भाजपासोबत गेल्याने हा सर्व मतदार तटकरेंवर कमालीचा नाराज आहे. सत्तेच्या सोयीप्रमाणे तटकरे हे पाठ फिरवित असल्याने, सोयीचे राजकारण बघत असल्याने सर्वसामान्य मतदारांचे व पक्षातील कार्यकर्त्यांचे मरण झाले आहे. आम्ही कोणाला व का विरोध करायचा? ज्यांना विरोध करायचा त्यांच्या विरोधात मतदारसंघात दुश्मनी पत्करायची व निवडून गेल्यानंतर तटकरे कुटुंब सोयीचे राजकारण करतात, अशी चर्चा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात फेरफटका मारल्यावर जनतेच्या तोंडून ऐकण्यास मिळाली.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, ज्यांच्यावर रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी, ठाणे व पालघर या मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यातील एकमेव रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार आहे. उर्वरित ठाणे जिल्ह्यातील ठाणे- लोकसभा मतदारसंघात राजन विचारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ श्रीकांत शिंदे (शिंदे गट), भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील (भाजपा), पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावित (शिंदे गट), मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे (शिंदे गट) आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) असे खासदार आहेत.

रायगडातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पक्षात दोन गट पडल्याने विभागली गेली आहे. या सर्व मतदारसंघात विद्यमान खासदार हे निवडणूक लढवण्यास सक्षम असल्याने अजित पवार गटाला रायगड लोकसभा मतदारसंघ वगळता अन्य कोणत्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार? हाच खरा मूळ प्रश्न आहे. मग आदिती तटकरेंवर रायगड वगळता अन्य सात लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देणे हा केवळ फार्स आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ज्याप्रमाणे अजित पवार हे शरद पवारांना वारंवार भेटले, मात्र सुनील तटकरे हे शरद पवारांना किती वेळा भेटले? पवारांनी त्यांना भेट दिली का? की भेट नाकारली? तटकरे हे पवारांना भेटायला घाबरत तर नाहीत ना? असा प्रश्न देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे चार जिल्ह्यांची जबाबदारी ज्या आदिती तटकरे यांच्यावर पडली आहे, पर्यायाने तटकरे कुटुंबावरच पडली आहे, त्यांचा ‘तटकरे पॅटर्न चालणार की फुसका बार ठरणार’ ही येणारी निवडणूकच ठरविणार आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी
विश्लेषण

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा ‘माधव’ तर पवारांचा ‘मराठा माळी बहुजन’ फॉर्मुला!

Twitter : @manemilind70 मुंबई काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, शिंदे