आ.प्रविण दरेकरांचा गौप्यस्फोट
Twitter : @NalavadeAnant
मुंबई
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh CM Bhupesh Baghel) यांचा सट्टेबाजीत सहभाग असून महादेव अँपच्या (Mahadev App) माध्यमातून त्यांना ५०८ कोटी मिळाले आहेत, हे पैसे निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होते, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आ. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्यामुळे विकासाचा दावा करणारी काँग्रेस छत्तीसगडचा विकास करण्याऐवजी सट्टेबाजीत मग्न होती. काँग्रेसचा विकासाचा बुरखाही टराटरा फाडला गेल्याची घणाघाती टीकाही दरेकर यांनी केली.
दारेकर म्हणाले की, ७ आणि १७ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या (Assembly elections 2023) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव अँपच्या प्रवर्तकाच्या माध्यमातून मोठी रक्कम छत्तीसगडमध्ये हलवली जात असल्याची माहिती २ नोव्हेंबर ला ई डीला गुप्तपणे मिळाली. त्याआधारे ईडीने हॉटेल टायटन आणि अन्य ठिकाणी छापेमारी केली. यासंदर्भात यूएईमधून (UAE) पाठविण्यात आलेला खास कॅशदूत असीम दास यालाही ईडीने ताब्यात घेतले आहे. असीम दासचे घर, कारमधून साधारणत: ५ कोटी ३९ लाख रुपये जप्त करण्यात आले असून असीम दास याने याची कबुलीही दिली असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
दरेकर म्हणाले की, ईडीने महादेव अँपची अनेक बोगस खाती शोधली असून त्यातही साधारण १५ कोटी ५९ लाख रुपयांची शिल्लक ईडीने गोठवून असीम दासलाही अटक केली आहे. या सट्टेबाजी सिंडिकेटचे प्रवर्तक परदेशात बसून अनेक पॅनल चालवत असल्याचेही पुढे आले आहे. त्यातूनही कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असून ईडीने आतापर्यंत ४ आरोपीना अटक केली आहे. ५० कोटींहून अधिकची रक्कम जप्त केली आहे. तर १४ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही दरेकर यांनी दिली
असीम दास हा सोहम सोनीच्या माध्यमातून छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांना पैसे पाठवत होता हे खरे आहे का? असीम दासला व्हाईस मॅसेजद्वारे रायपूरला जाऊन भूपेश बघेल यांना निवडणूक खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश देण्यात आले होते हे खरे आहे का? २ नोव्हेंबर रोजी हॉटेल टायटनमध्ये असीम दास यांच्याकडून पैसे जप्त करण्यात आले हे खरे आहे का? पीएमएलए अंतर्गत वेगवेगळ्या खात्यामध्ये १५ कोटी रुपये गोठवण्यात आलेत हे खरे आहे का? असीम दास नावाच्या व्यक्तीकडून साडेपाच कोटीच्या आसपास रक्कम जमा करण्यात आली हे खरे आहे का?, असे प्रश्न यावेळी दरेकर यांनी भाजपातर्फे काँग्रेसला विचारले आहेत. तसेच विकासाच्या ऐवजी सट्टेबाजीत मग्न असणाऱ्या भूपेश बघेल यांच्या काँग्रेस सरकारचे बिंग यानिमित्ताने उघडं झाले असून या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची नाकाने कांदे सोलणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आम्हाला मिळतील, अशी अपेक्षा असल्याचेही दरेकर यांनी यावेळी नमूद केले.