Twitter : @NalavadeAnant
मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृती दिनाला गालबोट लागू नये, यासाठी आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळेच स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनाप्रमुखांना वंदन करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला आम्ही जातो. परंतु, आज त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करून स्मृतीदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार अत्यंत दूर्दैवी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मी राज्याचा मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. स्मृतीदिनी मी आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक स्मृतीस्थळावर कधीही जाऊ शकतात. परंतु, तिथे वाद नको म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार मी, शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मृतीस्थळावर गेलो होतो. मी दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आले नव्हते. मात्र मी निघाल्यावर तिथे उबाठा गटाने घोषणाबाजी सुरू केली. महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले. धक्काबुक्की केली. ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण नाही. त्यांच्या स्मृतीदिनी अशा पद्धतीने वाद उकरून काढणे, अशांतता निर्माण करणे आणि कायदा- सुव्यवस्था याला बाधा आणणे अत्यंत निषेधार्थ असल्याचे मतही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे (Law and order) ही सर्वांचीच जबाबदारी असून त्यात कुणीही बाधा निर्माण करू नये, अशी भूमिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.