Twitter : @NalavadeAnant
मुंबई
उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार यांना गेले काही दिवस डेंग्यूची लागण झाली होती, हि वस्तुस्थिती आम्ही अनेक वेळा पत्रकारांसमोर मांडली. तरी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत हे अजित पवारांच्या आजाराबद्दल संभ्रमाची वक्तव्य करीत आहेत. त्यामूळे आता त्यांनी आपली वक्तव्य थांबवली नाही, तर मग आम्हालाही कोविड काळात उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) झालेल्या आजाराबद्दल बोलावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे (NCP MP Sunil Tatkare)यांनी शुक्रवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाली असताना उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे नेते खा. संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) मात्र अजित पवारांचा आजार हा राजकीय डेंग्यू असल्याचे वक्तव्य सातत्याने करत आहेत. याकडेही खा. तटकरे यांचे लक्ष वेधले असता काहीसे संतापूनच खा. तटकरे यांनी खा. राऊत यांना थेट निर्वाणीचाच इशारा दिला.
खा. तटकरे यांनी सांगितले की, आताच काही दिवसांपूर्वी अजितदादा (Ajit Pawar) आजारातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर आपण स्वतः पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल व अजितदादा असे आम्ही तिघे जण दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री व भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यावेळीही स्वतः शहा यांनी अजितदादांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. या भेटीत काहीही राजकीय चर्चा झाली नाही. असे असताना खा. संजय राऊत वादग्रस्त वक्तव्ये करुन वातावरण तापवत आहेत. आता त्यांनीच याला आवर घालावा, अशी सक्त तंबीही खा. तटकरे यांनी खा. राऊत यांना दिली.
“घड्याळ तेच वेळ नवी” ‘निर्धार नवपर्वाचा’ हे घोषवाक्य घेत महाराष्ट्रात राज्यव्यापी दौरा सुरू केला असून त्याच पार्श्वभूमीवर दोन दिवसीय ‘विचार शिबीर’ येत्या ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर यादिवशी कर्जत (रायगड) येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही खा. तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संसदीय अधिवेशन ४ डिसेंबर आणि ७ डिसेंबरपासून नागपूरचे हिवाळी अधिवेशन (Winter session of State Legislature) सुरू होत आहे. त्यामुळे डिसेंबर महिना हा यामध्ये जाणार आहे तर जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीचे वेध लागू शकतात, अशावेळी एनडीए (NDA) आणि महायुती सरकारमधील घटक म्हणून एकत्रित निवडणूकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली राजकीय भूमिका आणि महायुतीत (Mahayuti) राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा सहभाग त्यातून राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली उल्लेखनीय कामगिरी व राजकीय भूमिका ठळकपणे समोर ठेवून त्यातून विचारमंथन, चर्चा आणि कार्यकर्त्यांना काय वाटते ते समजून घेणे व येणाऱ्या आव्हानांना पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने भूमिकेशी समरसपणे सामोरे जाणार आहोत. हे विचार शिबीर त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही खा. तटकरे यांनी यावेळी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.