मुंबई
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे निरगुंडे यांच्याकडून सरकारमधील दोन मंत्री आयोगाच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य सरकारने निरगुडे यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे.
यावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहे. अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना याबाबत सरकारने कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही? सरकारचं नेमकं अस चाललं काय ? राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य आणि आता अध्यक्ष का राजीनामा देत आहे याबाबत सरकारने सभागृहात स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी वडेट्टीवारांनी ट्विट करून केली आहे.