मुंबई
देशभरात अयोध्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान आज अयोध्या रेल्वे स्थापनाकाचं आणि विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गाजतवाजत करण्यात आलं. अयोध्येच मोदींच्या रोड शोचं भव्य आयोजनही करण्यात आलं आहे. एखाद्या सण-उत्सवाप्रमाणे देशभरात राम मंदिरांची तयारी सुरू आहे.
विरोधकांकडून मात्र भाजप श्रीरामाचं राजकारण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. संजय राऊतांनी अनेक वेळा याविषयी भाष्य केलं. आता भाजपकडून श्रीरामालाचं लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट देण्याचं बाकी असल्याची कोपरखळी संजय राऊतांनी मारली आहे. भाजपकडून आता २२ जानेवारीला एवढच जाहीर करण्यातं शिल्लक राहिलंय, असंही राऊत यावेळी म्हणाले.
मेरिटवर जागावाटप
मविआमधील जागावाटपाच तिढा अद्याप कायम असून संजय राऊतांनी ठाकरे गटाकडून २३ जागांवर दावा केला आहे, जिंकलेल्या १८ जागांवर तर चर्चाही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय मेरिटवर जागावाटप होईल असंही ते म्हणाले. यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. आणि २०१९ च्या निवडणुकीवरुन मेरिट ठरवता येणार नाही, असं सांगितलं. गेली निवडणूक शिवसेना भाजपसोबत लढली होती. मात्र त्यानंतर शिवसेनेचे दोन भाग झाले. आता त्याच मुद्द्याचं गणित यंदाच्या निवडणुकीत लावता येऊ शकणार नाही, अशी भूमिका निरूपमांनी मांडली.