भंडारा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे खास निकटवर्तीय असलेले परिणय फुके यांच्या सोशल मीडियावर नजर टाकली तरी त्यातून वेगळंच चित्र दिसून येत आहे. त्यांनी काही तासांपूर्वी एक ट्विट केलं होतं. यात ‘इस बार धूम मचाऐंगे’ अशी ओळ लिहिली आहे. जरी ही ओळ सर्वसाधारण वाटत असली तरी यामागील अर्थ खोल आहे.
परिणय फुके येत्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यांना फडणवीसांचं पाठबळ असल्याचंही सांगितलं जात आहे. तरी अद्याप त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.
यापूर्वी जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. शिवाय ५ जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने गोंदियातील रस्त्यावर, गल्लोगल्ली आणि नाक्यावर फुके यांच्या नावाचे मोठमोठे बॅनर्स दिसत होते.
भंडारा-गोंदिया मतदारसंघ…
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपचे सुनील मेंढे ६,४६,१५२ मतांनी विजयी झाले होते. त्यापूर्वी २०१४ च्या लोकसभेत या जागेवरुन नाना पटोले (२०१८ मध्ये काँग्रेसमध्य प्रवेश) भाजपमधून विजयी झाले होते. तर त्या वर्षी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल याच मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही पटेलांसाठी या जागेवर दावा केला जाऊ शकतो. तर याच मतदारसंघासाठी विधानपरिषदेचे आमदार असलेले परिणय फुके इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील मेंढे, प्रफुल्ल पटेल आणि परिणय फुके यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.