नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भा प्रांताची समन्वय बैठक आज, सोमवारी रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात घेण्यात आली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंसह ज्येष्ठ भाजप नेते आज, सोमवारी साकाळी 9.30 वाजेच्या सुमाराला रेशीमबागेत पोहचले. याठिकाणी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महर्षि व्यास सभागृहात बैठक झाली.
संघ आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नियोजन, समन्वय आणि कार्यविस्तारासाठी वेळोवेळी अशा प्रकारच्या बैठकीत होत असते. यापूर्वी 2 जुलै 2023 रोजी भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. यावर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. तसेच राज्याच्या राजकारणात गेल्या 2 वर्षातील राजकीय आणि सामाजिक घडामोडी आणि त्याचा निवडणूक आणि समाजकारणावरील संभाव्य प्रभाव आणि परिणाम यानुषंगाने बैठकीत विशेष मंथन झाल्याची माहिती माहिती ज्येष्ठ भाजप नेत्याने दिली.
राज्याच्या राजकारणातील भाजपचा पारंपारिक सहकारी असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फूट पडली. त्यानंतर या दोन्ही पक्षांमधील मोठे गट भाजपसोबत आलेत. त्यामुळे 3 पक्षांचे राजकारण आणि निवडणुकीसाठीचे जागावाटप याबाबत या समन्वय बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजुला तब्बल 14 पक्षांची महायुती अशा दोन ध्रुवीय राजकारणात भाजपला लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा कशा निवडून आणता येईल. तसेच सामाजिक व राजकीय परिस्थितीतील प्रतिकूलता कमी करण्यासाठी काय करता येईल या मुद्यावरही बैठकीत प्रकाश टाकण्यात आला.
नागपुरात महायुतीच्या 14 पक्षांचा मेळावा झाला. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), पिरिपा, आरपीआय (आठवले), ब.वि.आ., जेएसएस., आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, बरिएमं, शिवसंग्राम यांचा प्रामुख्याने समावेश होता. इसके सर्व पक्ष आणि मुद्दे घेऊन जागा वाटप कसे करायचे आणि लोकसभेत भाजपला अधिकाधिक लाभ कसा प्राप्त करता येईल हा विषय बैठकीच्या केंद्रस्थानी असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. दरम्यान या बैठकीसंदर्भात संघाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासूनच सत्तेच्या राजकारणापासून लांब राहतो. त्यामुळे जागावाटप, निवडणूक असे विषय संघाच्या एजेंड्यावर नसतात. भाजप वेळोवेळी राजकारणाशी संबंधित नसलेल्या विषयांवर संघाचे मार्गदर्शन घेत असतो. त्याचाच एक भाग म्हणून सामान्य चर्चेसाठी ही बैठक असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.