नागपूर
एका व्यक्तीसोबत त्याच्या कुटुंबालाही जोडून घेण्याचा प्रयत्न संघाकडून आगामी काळात केला जात आहे. दररोज शक्य नसेल तरी कुटुंबाची किमान साप्ताहिक शाखा घेण्याचा संघाचा मानस आहे. संपूर्ण कुटुंब एखाद्या विचाराशी जोडले गेले तर ते वैचारिक अधिष्ठान पुढच्या पिढीकडे देखील हस्तांतरित होत असल्याने संघाकडून नवं पाऊल उचललं जात आहे.
संघाच्या प्रतिनिधी सभेत भविष्यातील योजनांवर विचारमंथन करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात आतापर्यंत संघाच्या संपर्कात नसलेल्या कुटुंबाशी वैयक्तिक संपर्क प्रस्थापित केला आहे. यातूनच संघ कौटुंबिक शाखा संकल्पनेवर लक्ष केंद्रीत करणार आहे. यावर्षी १५ ते १७ मार्च दरम्यान नागपुरात आयोजित प्रतिनिधी सभेच्या बैठकीत यावर विचारमंथन होणार असल्याची माहिती आहे.
अयोध्या राम मंदिर निधी संकलन, अक्षता पुजनाच्या निमित्ताने संघाचे सदस्य घराघरांपर्यंत पोहोचले. संघ परिचय वा परिवारातील कुटुंबासह अनेक नव्या कुटुंबाशी यानिमित्ताने संपर्क आला. या सर्व कुटुंबाची नावं, पत्ता, फोन नंबर्स संघाकडे आहेत. या सर्व कुटुंबाशी भविष्यातही संघाकडून संपर्क ठेवला जाणार आहे. या कुटुंबाची साप्ताहिक शाखा घेण्याचा संघाचा मानस आहे.
२०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचं शताब्दी वर्ष आहे. त्यावरही प्रतिनिधीसभेत चर्चा होणार आहे. त्याशिवाय क्षेत्र स्तरावर तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग घेतला जाणार आहे. आतापर्यंत तृतीय वर्षाच्या प्रशिक्षणासाठी स्वयंसेवकांना नागपुरातच यावं लागत होतं, मात्र आता हे स्वरुप बदललं आहे. यावरही प्रतिनिधी सभेत विचारमंथन होऊ शकतं.
दरवर्षी संघाची प्रतिनिधी सभा होते. यात वर्षभराचा आढावा आणि भविष्यातील योजनांवर चर्चा होते, अनेक धोरणं आखली जातात. संघ परिवारातील १२०० ते १४०० स्वयंसेवक या सभेत सहभागी होतात. संघाच्या इतर प्रतिनिधी सभा देशाच्या विविध भागात होत असल्या तरी निवडणुकीच्या वर्षी मात्र प्रतिनिधी सभा बैठक नागपुरातच आयोजित केली जाते. दर तीन वर्षांनी सरकार्यवाहांची निवड केली जाते. २०२१ मध्ये दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली होती. आगामी सभेत पुन्हा एकदा सरकार्यवाहांची निवड केली जाणार आहे.