मुंबई
आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे, असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
कोणत्याही पक्षाच्या आधाराने लढले, तर त्या पक्षांची बंधने येतात आणि बंधने असली की, गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गरीब मराठ्यांचे आणि ओबीसीचे ताट वेगळे हवे. पक्षाच्यावतीने आम्ही भूमिका जाहीर केली आहे. त्यानुसार ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तसं झालं तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्यांचं ताट आणि ओबीसींचं ताट वेगळं असावं अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. ओबीसींमध्ये राजकीय जागृती झाली याबाबत मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली असे मी मानतो. आपल्या अधिकारांची लढाई असे स्वरूप आता येत आहे आणि भाजपची धार्मिक विचारधारा गळून पडत आहे असे आम्ही मानत असल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
…ते काँग्रेसवालेच सांगू शकतील
पत्रकारांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचाराला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये का गेले, याचं उत्तर काँग्रेसवाल्यांनीच द्यायला हवं. इतर कोणीच यावर उत्तर देऊ शकत नाही असं मला वाटतं.