शिवनेरी
आज १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती साजरी केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सध्या राज्यभरातील वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथील शिवाजी महाजारांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केलं. याशिवाय आग्र्यातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’मध्ये छत्रपती शिवरायांच्या सोहळ्याची लगबग रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गेल्या चार दिवसांपासून आग्रा शहरात शिवजयंतीचे 300 फलक लावण्यात आले असून लाल किल्ला 1,000 दिव्यांनी उजळवून टाकण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रात्री बारा वाजता श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पाळणा सोहळा उत्साहात पार पडला.