मुंबई
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
२१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये दाखल केलं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द….
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी महाराष्ट्राच्या कोकण भागात झाला. त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. मनोहर जोशी यांच्या पत्नीचे नाव अनघा जोशी होते, त्यांचे 2020 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. मनोहर जोशी यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द आरएसएसमधून सुरू झाली, पण नंतर ते शिवसेनेत दाखल झाले आणि जवळपास चार दशके शिवसेनेशी जोडले गेले. मनोहर जोशी 1980 च्या दशकात शिवसेनेचे एक शक्तिशाली नेते म्हणून उदयास आले आणि ते पक्ष संघटनेवर पकड म्हणून ओळखले जात होते. मनोहर जोशी हे 1995-1999 या काळात शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते 2002 ते 2004 या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते. मनोहर जोशी यांनी 1967 मध्ये शिक्षक म्हणून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते १९६८-७० पर्यंत मुंबई महापालिकेचे नगरसेवक आणि नंतर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही होते. मनोहर जोशी हे 1976-77 दरम्यान मुंबईचे महापौरही होते. मनोहर जोशी 1972 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि तीन वेळा ते सदस्य राहिले. 1990 मध्ये मनोहर जोशी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि याच काळात ते विरोधी पक्षनेतेही होते.