नवी दिल्ली : आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये दिल्लीतील लोकसभा मतदारसंघातील जागावाटपावर एकमत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक दोघेही एकत्र लढणार आहेत. आपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाबाबत काँग्रेस आणि आपमध्येही मतभेद दूर झालेले आहेत. लवकरच दोन्ही पार्टी अधिकृतपणे जागावाटपाची घोषणा करतील. या आठवड्याच्या शेवटपर्यंत दोन्ही पार्टी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याची घोषणा करतील.
दिल्लीत ४-३ चा फॉर्म्युला…
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत ४-३ चा फॉर्म्युला नक्की करण्यात आला आहे. एमसीडी आणि गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि वोट बँकेची मजबूत स्थिती पाहता आप ४ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. गेल्या लोकसभेत दिल्लीच्या ७ पैकी ५ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार होते. त्यामुळे काँग्रेसला ३ जागा देण्याबाबत दोघांमध्य मतैक्य झालं आहे. सूत्रांनुसार, नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली, पश्चिम दिल्ली या जागांवर आप निवडणूक लढू शकते. तर पूर्व दिल्ली, ईशान्य दिल्ली आणि चांदणी चौक या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार देऊ शकते.
दिल्लीतील ग्रामीण भाग, झोपडपट्ट्या आणि अनधिकृत वसाहतींच्या व्होटबँकेवर आम आदमी पक्षाची मजबूत पकड आहे. गेल्या वेळी पक्ष ईशान्य आणि दक्षिण दिल्लीत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याचबरोबर पश्चिम आणि नवी दिल्लीतही काँग्रेसच्या मदतीने पक्षाला पाठिंबा वाढवण्यास मदत मिळू शकते. काँग्रेस सोडून आपमध्ये सामील झालेले पश्चिम दिल्लीचे माजी खासदार महाबदल मिश्रा पश्चिम दिल्लीत आपसाठी फायद्याचे ठरू शकातत. तर दुसरीकडे नवी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपला टक्कर देऊ शकेल असा तरुण उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. हरियाणा, पंजाब, चंदीगड, गुजरात आणि गोवा या राज्यात दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत झाल्याने दिल्लीत युतीचा फॉर्म्युला निश्चित होऊ शकला आहे.