मुंबई
महाविकास आघाडीसह महायुतीनेही अद्याप लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी केवळ अंदाज वर्तवले जात असताना भाजपने राज्यातील २३ जागांसाठी निरीक्षक नेमल्याचं समोर आलं आहे.
गेल्या वेळी जिंकलेल्या २३ जागांसाठीच निरीक्षक नेमल्याने जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपच्या मिशन ३७० साठी महाराष्ट्रातून मित्रपक्षांसह ४२ हून जास्त जागा जिंकायच्या आहेत. यासाठी भाजपची तयारी सुरू झाली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील २३ जागांवर विजय मिळवला होता. त्याच जागांवर भाजपकडून निरीक्षक नेमण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्येक जागेवर दोन निरीक्षक नेमण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून १८ जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे गणित पाहिलं तर भाजप २३, शिवसेना शिंदे गट १८ आणि उरलेल्या ७ जागा अजित पवार गटाला देणार का हा प्रश्न आहे.
आतापर्यंत भाजपकडून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली जात आहे. महायुतीत भाजप ३२ जागा लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदेंची शिवसेना १० जागांवर तर अजित पवारांची राष्ट्रवादी ६ जागावंर लढणार आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. अशी चर्चा असताना भाजपने केवळ २३ जागांवर निरीक्षकांची नेमणूक केली असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.