नवी दिल्ली : काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक झाली. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार यावर पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास असून सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांतील कृती आराखड्यावर मंत्रीपरिषदेत चर्चा झाली. याशिवाय पुढील पाच वर्षांच्या तपशीलवर कृती आराखडा आणि विकसित भारत : २०४७ या व्हिजन डॉक्युमेंटवर चर्चा करण्यात आली. याशिवाय विजयानंतर पुन्हा भेटू असा संदेशही मोदींनी यावेळी दिला.
पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांचं बौद्धिक
पुढील दोन आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी मंत्र्यांचं बौद्धिक घेतल्याची माहिती आहे. यावेळी त्यांनी मंत्र्यांना प्रचारावेळी वादविवादापासून लांब राहण्याचा सल्ला दिल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान कालच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी नवीन सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या कार्यसूचीवर विचारमंथन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, विकसित भारत हा रोडमॅप २ वर्षांच्या तयारीतून बनवण्यात आला आहे. यात शिक्षणतज्ज्ञ, उद्योग, नागरी समाज, वैज्ञानिक संस्था आणि २० लाख तरुणांची मतं जाणून घेतली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पुढील १० दिवसात १२ राज्यांचा दौरा करणार असल्याची माहिती आहे.
गृहमंत्र्यांचा मराठवाडा दौरा
आता ५ मार्च रोजी गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा निश्चित करण्यात आला असून यावेळी मराठवाड्यासह खान्देश आणि विदर्भाची लोकसभा उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. अमित शाह यांचा मराठवाडा दौरा दोनदा जाहीर झाला होता. मात्र काही कारणास्तव तो रद्द करावा लागला होता.