मुंबई: नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय असणार तसेच ते कुठल्या पक्षासोबत जातील या बद्दल विविध तर्क-वितर्क, अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र त्यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असे असतानाच आता “आमच्या पक्षात या.. “ अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Group) आणि काँग्रेस पक्षाकडून (Congress) देण्यात आली आहे. स्वत: वसंत मोरे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
“काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे, माजी आमदार मोहन जोशींचा फोन आला होता, तसेच उद्धव ठाकरे गटाने सुद्धा ऑफर दिली आहे” असं ते म्हणाले. “मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. कुणाकडून लढणार ते लवकरच जाहीर करणार, कालच्या निर्णयामुळे माझ्या आईला दुःख झालं आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला राज ठाकरेंशी बोलायचं नाहीय. अविनाश जाधव यांनी काही बोलू नये, अन्यथा मलाही बोलावं लागेल आणि लवकरच त्यांच्या टीकेला उत्तर देणार,” असे वसंत मोरे म्हणाले.
वसंत मोरे यांनी 18 वर्षापासूनची असणारी मनसेची (MNS) साथ सोडली. पक्ष सोडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोरे भावूक झाले होते. त्यांचे डोळे पाणावले होते. पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नव्हती. म्हणून अखेरीस खेदाने पक्ष सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले. मागच्या एक ते दीड वर्षांपासून पक्षात ते नाराज होते. सतत त्यांच्या अस्वस्थतेच्या बातम्या येत होत्या. व्हॉट्स अप स्टेटसमधून ते मनातील खदखद, भावना व्यक्त करत होते. त्यावरुनच पुणे मनसेमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत होते. अखेरीस काल मंगळवारी त्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. माझा वाद राजसाहेबांसोबत नव्हता. पुण्यात माझ्याविरोधात जे राजकारण झाले, त्याला कंटाळून मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची सुद्धा भेट घेतली होती. सध्या भाजपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत ते कोणत्या पक्षाकडून रिंगणात उतरणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत.