X: @therajkaran
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची (Election Commission of India ) आज बैठक पार पडली. या बैठकीत 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक कार्यक्रम घोषित होवून आदर्श आचारसंहिता लागणार आहे. देशभरात दहा किंवा अकरा टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील 48 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election) आता संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर होत असतानाच आदर्श आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेऊन तयार केली गेली नाही. सर्वच राजकीय पक्षांची मत आणि तज्ज्ञांचे मत घेऊन तयार केली आहे. त्यामध्ये वेळोवेळी बदलही होत असतात. देशात पहिली आचारसंहिता 1960 मध्ये तयार झाली होती. केरळ विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ही लागू करण्यात आली होती.
निवडणूक आचारसंहिते दरम्यान मतदारांना पैसे वाटणे, भेटवस्तू देणे, लालूच दाखवणे, आमिष देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. तसेच सरकारला विकासकामांची किंवा मतदारांवर प्रभाव पडले, अशी कोणताही घोषणा करता येत नाही. तसेच शासकीय अधिकाऱ्याची बदली करता येत नाही. अन्यथा ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते.
दरम्यान, लोकसभेच्या 543 जागांवर निवडणूका होणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलकांनी अनेक मतदार संघात एकाच जागांवर अनेक उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची ईव्हीएम मशिनवर निवडणूक कार्यक्रम घेताना अडचण होणार आहे. यातून निवडणूक आयोग कसा मार्ग काढते याकडेही लक्ष लागले आहे. निवडणूक तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे. या बैठकीत नव्याने नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू (Sukhbir Singh Sandhu) आणि ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) उपस्थित होते.