नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दर ३ वर्षांनी होणारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक यावेळी पहिल्यांदाच ६ वर्षांनी होते आहे. २०२१ साली कोरोनामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. संघ आणि संघ परिवारातील भाजपा, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासह ३६ संघटनांचे १५०० हून अधिक पदाधिकारी तीन दिवसांच्या या बैठकीला उपस्थित आहेत. पुढच्या तीन वर्षांत संघ परिवाराच्या वाटचालीबाबत या बैठकीत मंथन पार पडणार आहे.
२०२५ साल हे संघाचं शताब्दी वर्ष असल्यानं या वर्षात देशभरात १ लाख शाखांचा विस्तार करण्याचं ध्येय संघानं ठेवलेलं आहे. २०२३ पर्यंत हे ध्येय ६८ हजारांवर होतं. याचबरोबर महिला सबलीकरण हा मुद्दा संघानं अग्रक्रमावर घेतलेला आहे. महिलांच्या शाळांमध्ये वाढ व्हावी, यासाठीही प्रयत्न होणार आहेत.
अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीला ३०० वर्ष पूर्ण होत असल्यानं मे २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.
जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा परिणाम समाजातील सर्वच क्षेत्रांवर आहे. त्यामुळेच प्रतिनिधी सभेच्या बैठकीत देशातील महत्त्वाच्या विषयांवरही चिंतन होणार आहे.
१. संदेशखाली प्रकरण- प. बंगालमधील हिंदू स्त्रियांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल संघानं घेतलेली आहे. असे प्रकार इतरत्र देशात दुर्गम आणि ग्रामीण भागात घडत असल्याची शक्यता असल्यानं त्या त्या परिसरात महिला शाखा आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना संक्रिय होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्त्रियांना आत्मबल देण्यासाठी आगामी काळआत प्रयत्न होतील, अशी माहिती आहे.
२. मणिपूर हिंसाचार- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या अनेक दशकांपासून ईशान्य भारतात काम करतोय. तरीही मणिपूरसारखी घटना झाल्यानंतर यावर उपाययोजनेवर ऊहापोह या बैठकीत होणं अपेक्षित आहे. मणिपूरमध्ये दोन समुदायात झालेला संघर्ष, उद्भवलेला हिंसाचार आणि परराष्ट्रांतून यासाठी होणारी मदत हे थांबवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यावर खल होणार आहे. मणिपूर आणि ईशान्य भारतीतल इतर राज्यातही अधिक काम करण्याचा संकल्प या बैठकीत सोडला जाण्याची शक्यता आहे.
३. मंदिर मुक्ती आणि विश्व हिंदू परिषद समन्वय – अयोध्येतील राम मंदिर आंदोलोनाच्या यशस्वी सांगंतेनंतर आता पुढच्या टप्प्यात काशी, मथुरा या दोन मंदिरांचा प्रश्न संघाच्या प्रतिनिधी सभेत चर्चिला जाण्याची शक्यता आहे. अयोध्येच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विश्व हिंदू परिषदेची फेररचना, संघ समन्वय आणखी मजबूत करणे या गोष्टींवरही निर्णय होऊ शकतो. राम मंदिर आंदोलनानंतर विश्व हिंदू परिषदेला नवं ध्येय देण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि सामाजिक आंदोलनं, त्याचं राजकारण याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
४. नव्या सरकार्यवाहांची निवड – संघाच्या रचनेत सरसंघचलाक पदापाठोपाठ महत्त्वाच्या असलेल्या सरकार्यवाहपदासाठी योग्य व्यक्तीची निवड हाही विषय प्रतिनिधी सभेत चर्चिला जाण्याची शक्यता आहे. सध्या दत्तात्रय होसबाळे हे संघाचे सरकार्यवाह आहेत. हे पद तीन वर्षांसाठी असते. मात्र होसबाळे यांचीच पुन्हा यापदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.