मुंबई- भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही लोकसभेचं तिकिट देण्यात आलंय. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीतही राज्यातील काही मंत्रिमंडळातील मंत्री लोकसभेच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या तीन मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवतील असं सांगण्यात येतंय.
कोणत्या तीन मंत्र्यांना संधी
यवतमाळचे पालकमंत्री आणि मृद संधारण मंत्री संजय राठोड यांना लोकसभा तिकिट मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरे तर धाराशिव मतदारसंघातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत लोकसभा निवडणुकीत दिसू शकतील.
यवतमाळ मतदारसंघातून पुन्हा भावना गवळी यांना तिकिट मिळणार नाही, असं दिसतंय. गवळी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं आणि अनेक वर्ष त्या खासदार असल्यानं त्यांच्याविरोधात असलेला एन्टी इक्मबन्सीमुळेही हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बंजारा समाजाचं प्राबल्य लक्षात घेता या मतदारसंघातून संजय राठोड यांना संधी देण्यात येईल. एका तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणात राठोड हे ठाकरे सरकारच्या काळात अडचणीत आले होते. मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या राठोडांना पुन्हा संधी देण्यात येईल असं सांगण्यात येतंय.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याचा विचार आहे. भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादीही या मतदारसंघासाठी आग्रही आहे. मात्र हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेचा असल्यानं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सावंत य़ांना मात्र मंत्रीपद सोडून खासदार होण्याची इच्छा नसल्याची माहिती आहे. याचमुळे ते मंत्रिमंडळ बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत, असं सांगण्यात येतंय.
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर भाजपानं दावा केला असला तरी शिंदेंच्या शिवेसनेचा हा मतदारसंघ आहे. ही जागा मिळाल्यास रोहयो मंत्री संदीपान भुमरे हे उमेदवार असल्याचं सांगण्यात येतंय.