संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला प्रारंभ
X: @therajkaran
नागपूर: गेल्या काही वर्षात अल्पसंख्याक समाजाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक वाढली आहे. त्यांच्यातील संभ्रम आणि भीती हळूहळू कमी होत आहे. संघ देखील अल्पसंख्याकांमध्येही आपली सक्रियता वाढवत असल्याचे प्रतिपादन संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.
नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आणि सह-प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार आणि आलोक कुमार उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आज, शुक्रवारी नागपुरात सुरुवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी या सभेचे उद्घाटन केले.
या शुभारंभ कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले की, भारतात राहणाऱ्या सर्व 140 कोटी लोकांचे पूर्वज, मातृभूमी आणि संस्कृती एकच असल्याचे संघ मानतो. परिणामी, देशातील सर्व लोक हिंदू आहेत, अशी संघाची धारणा आहे. संघाच्या शाखांमध्ये अल्पसंख्याक समाजातील लोक सक्रिय आहेत. संघाशी जवळीक साधल्यामुळे अल्पसंख्याकांच्या मनातील भ्रम आणि भीती आता दूर होत असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
संघाच्या कार्याची माहिती देताना सहसरकार्यवाह म्हणाले की, गेल्या वर्षी देशभरात संघाच्या 68 हजार दैनिक शाखा होत्या. यंदा त्यात वाढ होऊन दैनिक शाखांची संख्या 73 हजार 117 झाली आहे. शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी देशभरात 1 लाख शाखा सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. शताब्दी वर्षात स्वयंसेवक समाजपरिवर्तनाच्या कार्यात सहभागी होणार आहेत. गेल्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी अयोध्येतून आणलेल्या अक्षतांचे घरोघरी वितरण करण्यात आले होते. यात संघ आणि समविचारी संघटनांचे 44 लाख 98 हजार कार्यकर्ते देशातील 5 लाख 98 हजार 778 गावांमध्ये पोहोचले होते. तसेच 19 कोटी 38 लाख कुटुंबांपर्यंत अक्षता पोहोचवण्यात आल्या आणि 22 जानेवारी रोजी 5 लाख 60 हजार ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे वैद्य यांनी सांगितले.
संघ शिक्षा वर्गातील बदलाबाबत माहिती देताना वैद्य म्हणाले की, पहिल्या वर्षाच्या प्रशिक्षणाला आता संघ शिक्षा वर्ग असे संबोधले जाईल, जे 20 दिवसांऐवजी 15 दिवसांचे असेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षाला कार्यकर्ता विकास वर्ग-1 आणि तिसऱ्या वर्षाला कार्यकर्ता विकास वर्ग-2 असे संबोधले जाईल. यामध्येही प्रात्यक्षिक शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. त्यापूर्वी 3 दिवसांचा परिचय वर्ग होईल. त्यानंतर 7 दिवसांचा प्राथमिक वर्ग घेतला जाणार आहे. यावेळी 13 मे ते 6 जून दरम्यान कार्यकर्ता विकास वर्ग 2 नागपुरात होणार आहे. यासोबतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती देताना वैद्य यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी संघाचे कार्यकर्ते घरोघरी जातील. देशात शंभर टक्के मतदान झाले पाहिजे ही संघाची भावना असल्याचे मनमोहन वैद्य यांनी सांगितले.