X: @therajkaran
शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला होता . मात्र आता त्यांच्यासोबत गेलेले दहा आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात (Uddhav Thackeray Group) परत येणार असल्याचा दावा ज्येष्ठ वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या पलिकडे कोणी ओळखत नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपले काही भवितव्य नसल्याचे या आमदारांना कळल्याने त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावाही सरोदे यांनी केला आहे.
सरोदे यांनी या घरवापसी करणाऱ्या आमदारांची नावेच वाचून दाखविली. यात श्रीनिवास वनगा, लता सोनावणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, उदयसिंह राजपूत, प्रदीप जयस्वाल, महेश शिंदे आणि प्रकाश आबिटकर या आमदारांचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर शिंदे गटाला जोरदार धक्का बसणार आहे.
“राष्ट्रवादीचे (NCP) सुद्धा अनेकजण परत येणार अशी बातमी आली आहे. शरद पवारांकडे ते परत जाणार आहेत. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हेच ठरवलं पाहिजे की विकला गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी, शरद पवारांनी ठरवलं नाही तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही. आपल्याला कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेले लोक निवडून देता येतील. तसे लोक निवडून देण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे,” असं असिम सरोदेंनी म्हटलं आहे.