मुंबई : महाविकास आघाडीमधील जागावाटपाची चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ठाकरे गट २४ आणि वंचित २४ या फॉर्म्युल्यापासून सुरुवात करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना मविआकडून जागावाटपाचा आकडा सांगण्यात आला आहे. आता आंबेडकरांना यावर निर्णय घ्यायचा असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. प्रकाश आंबेडकरांना मविआकडून लोकसभेसाठीचा आकडा सांगण्यात आला आहे. आंबेडकर यावर पक्षातंर्गत चर्चा करतील आणि यानंतर उत्तर देतील असं सांगत राऊतांनी आता बॉल आंबेडकरांच्या कोर्टात टाकला आहे.
आम्ही वंचित बहुजन आघाडीसाठी चार जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांकडे पाठवला आहे. आता ते आपल्या पक्षात याबाबत चर्चा केल्यानंतर आम्हाला उत्तर देतील. आजची बैठक ही काँग्रेस-शरद पवार गट आणि काँग्रेस-उद्धव ठाकरे गटात चर्चा होईल. या बैठकीत शरद पवार आणि केसी वेणुगोपालदेखील सामील होतील. या बैठकीत मुंबईसह महाराष्ट्रातील ज्या जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चा होईल. मविआमध्ये जागावाटप जवळपास नक्की झालं आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग आहेत आणि पाठवलेल्या प्रस्तावावर त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही पुन्हा मिळून चर्चा करू, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची ईडीकडून चौकशी होणार का?
गेमिंग आणि जुगार ॲपच्या कंपन्या इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक पैसे देतात. छत्तीसगडमध्ये निवडणुका होत्या तेव्हा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर गेमिंग ॲप्समध्ये गुंतवल्याचा आरोप करण्यात आला होता.ज्या कंपन्यांना फायदा झाला ते निवडणूक रोखे खरेदी करतात आणि भाजपला फायदा करून देतात. निवडणूक रोखे हा एक खाजगी फंड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे थोडी तरी नैतिकता राहिले असेल तर त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. पंतप्रधान कार्यालयाला निवडणूक रोखेंची फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या ३५० कंपन्यांची ईडीकडून चौकशी होणार का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. यावेळी राऊतांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला. गेल्या १० वर्षांपासून निवडणूक आयोग काम करीत आहे, पण ते निष्पक्ष नाहीत. ते भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचं दिसून येतंय. आता निवडणूक आयोगाने दोन नव्या आयुक्तांची नियुक्ती केली आहे, परंतू त्यांच्याकडून आम्हाला आणि देशाला काहीच अपेक्षा नाही, असंही ते म्हणाले.