मुंबई – २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केलेल्या एमआयएमनंही राज्यात लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. २०१९ साली वंचितसोबत आघाडी करुन एमआयएमनं लोकसभा लढवली होती आणि संभाजीनगरच्या जागेवर इम्तियाज जलील निवडून आले होते. आता या लोकसभेला एमायएम किती जागा लढवणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं.
काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील
महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भाजपानं पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी हा जागावाटपाचा तिढा सुटण्यासाठी आणखी काही दिवसांचा वेळ लागेल, असं सांगण्यात येतंय. या सगळ्यांचा जागावाटपानंतर एमआयएम आपले पत्ते उघड करेल, असं जलील यांनी सांगितलं आहे.
एमआयएम किती जागा लढवणार
राज्यात सध्या सहा जागा लढवण्याचा एमायएम विचार करते आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड अशा मराठवाड्यातील दोन, विदर्भातील दोन तर मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील एक अशा सहा जागांचा विचार एमआयएमकडून सुरु आहे. आत्तापर्यंत या सहा जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यात आगामी काळात भरही पडू शकते, असे संकेत जलील यांनी दिलेले आहेत.
वंचितच्या साथीचा झाला होता फायदा
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत वंचितसोबोत लढण्याचा फायदा एमआयएमला झाला होता. त्यानंतर विधानसभेला जागावाटपावरुन विधानसभेत वंचितसोबोतची एमआयएमची आघाडी तुटली, तरीही दोन आमदार एमआयएमचे निवडून आले होते. धुळे शहर मतदारसंघातून शाह फकुर अन्वर, तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल जिंकून आले होते.