चंद्रपूर – शिंदेंच्या शिवसेनेतील 12 आणदार ठाकरेंच्या शिवसेनेत परततील, असा खळबळजनक दावा प्रसिद्ध वकील आणि ठाकरेंचा खटला सुप्रीम कोर्टात लढणारे असीम सरोदे यांनी केला आहे. चंद्रपुरात निर्भय बनोच्या सभेत त्यांनी हा दावा केलाय. इतकंच नाही तर त्यांनी या सभेत या 12 आमदारांची नावंही वाचून दाखवली आहेत. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.
कोणते 12 आमदार परतण्याची शक्यता?
असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्यानुसार
- श्रीनिवसा वनगा, पालघर
- लता सोनावणे, चोपडा
- महेंद्र दळवी
- प्रकाश सुर्वे,
- बालाजी कल्याणकर
- चिमणराव पाटील
- नितीन तळे
- प्रदीप जैस्वाल
- महेश शिंदे
- प्रकाश आबिटकर
या 10 नावांसह आणखी दोन आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत परततील, असा दावा करण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करुन गेलेल्या आमदारांना आता आपलं भवितव्य दिसत नसल्यानं हा निर्णय घेणार असल्याचंही सरोदे म्हणाले आहेत. या आमदारांची जरी परतण्याची इच्छा असली तरी त्यांना पक्षात परत घेऊ नये, अशी मागणीही उद्धव ठाकरेंकडे सरोदे यांनी केली आहे.
जागावाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे आमदार नाराज?
लोकसभा निवडणुकींच्या जागावाटपात भाजपा ३० पेक्षा जास्त जागा लढेल असं सांगण्यात येतंय. महायुतीत अजित पवार आल्यानं आधीच सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला कमी मंत्रीपदं मिळालेली आहेत. त्यातच लोकसभेतही १३ खासदार असूनही कमी जागा मिळाल्यास शिंदे गटात नाराजीचा सूर व्यक्त होतोय. यापूर्वी गजानन कीर्तिकरांनी यावर थेट भाष्य करत यासाठी एकनाथ शिंदेंना जबाबदार धरलेलं आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर शिंदे यांनी भाजपाच्या ताटाखालचं मांजर होऊ नये, असा सूर कीर्तिकरांचा होता.
लोकसभेला कमी जागा मिळाल्यास विधानसभेलाही तितक्याच कमी जागा पदरात पडतील अशी भीती अनेक आमदारांच्या मनात आहे, त्यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेतील अस्वस्थ आमदार विधानसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा स्वगृही परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येतंय. आता १२ आमदारांची नावचं थेट असीम सरोदे यांनी वाचून दाखवल्यानं, येत्या काळात राजकारणात नवे धक्के बसणार का, असा प्रश्न निर्माण झालाय.