मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) अनेक ठिकाणी कमी मतदान झाल्याचे प्रकार घडले. मतदान सर्वांना करता आले पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एक उपाय म्हणून पोलिंग बूथची (Polling booth) संख्या निवडणूक आयोगाने वाढवावी. सध्या किमान हजार ते बाराशे मतदारांसाठी एक पोलिंग बूथची व्यवस्था असते, त्यात बदल करून कमाल पाचशे मतदार संख्येसाठी एक पोलिंग बूथ या प्रमाणे पोलिंग बूथ तयार करून बूथची संख्या वाढवावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज केली आहे. त्याबाबतचे पत्र रामदास आठवलेंनी भारत निवडणूक आयोगाला (Election Commission of India) ईमेलवर पाठवले आहे.
सध्या एका पोलिंग बूथमध्ये एक हजार पेक्षा जास्त मतदार असतात, त्यामुळे मतदान करताना अनेक ठिकाणी रांगा लागतात. अनेक ठिकाणी दोन – दोन तास मतदारांना रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे अनेक मतदार कंटाळून रांग सोडून जातात. मतदान करणे टाळतात. त्यातून मतदानाची टक्केवारी घसरते. त्यामुळे मतदान बूथमध्ये एक हजार पेक्षा जास्त मतदार असण्यापेक्षा ती संख्या कमी करावी. एक हजार ऐवजी किमान पाचशे लोकांसाठी एक मतदान बूथ याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पाचशे मतदार संख्येचा एक बूथ तयार करून निवडणूक आयोगाने बूथची संख्या वाढवावी. ही सुधारणा पुढील निवडणुकीत निवडणूक आयोगाने लागू करावी, अशी सूचना रामदास आठवलेंनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे. कमी मतदार संख्येचे बूथ तयार करून पोलिंग बूथची संख्या वाढल्यास मतदानाची टक्केवारी वाढू शकते, अशी सूचना निवडणूक आयोगाला आठवले यांनी केली आहे.