X : @NalavadeAnant
मुंबई – राज्यात पावसाची स्थिती गंभीर असून १९ जिल्ह्यातील ४० तालुके गंभीर, तर १६ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ (drought) म्हणजेच ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. आता लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडलेल्या असताना दुष्काळी परिस्थितीकडे मात्र राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे, अशा शब्दांत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला.
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत ही परिस्थिती महाराष्ट्रात जून अखेरपर्यंत राहिल्यास दुष्काळाची परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता असल्याची भीतीही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यात २ हजार ९२ मंडळ असून १५०० मंडळात दुष्काळ राज्यात जाहीर करण्यात आला आहे. त्यात मराठवाडा (Marathwada) आणि पुण्यातील (Pune) काही भागात गंभीर परिस्थिती आहे. देशात सर्वाधिक धरणे (dams) राज्यात असताना देखील पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.
मराठवाड्यात ४० महत्वाची धरणे असताना या विभागात फक्त १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या विभागासह अशीच परिस्थिती अनेक जिल्ह्यांची आहे. छत्रपती संभाजी नगरला ८१ लघु प्रकल्प आहेत, इथे फक्त सहा टक्के पाणी शिल्लक आहे. पुण्यामध्ये पन्नास प्रकल्प आहेत, या भागात फक्त २४ टक्के पाणी शिल्लक असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले की, कृषीमंत्र्यांचा (Dhananjay Munde) बीड (Beed) जिल्हा दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना कृषी मंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे. सरकारमधील फक्त दोनच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असतील तर मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Eknath Shinde) याची दखल घेणे गरजेचे असल्याचे पवार यांनी नमूद केले.