मुंबई : लोकसभा निकडणुकीच्या अंतिम टप्यातील रणधुमाळी सुरु असताना अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे… महाराष्ट्रात काय होणार? याकडे देशाचं लक्ष आहे.अशातच आता या निवडणूक काळात शरद पवारांना मोठा धक्का (NCP Sharad Pawar Group) बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील दिल्लीतील युवा चेहरा राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे धीरज शर्मा (Dheeraj Sharma) आणि युवती राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन( Sonia Doohan )हे पक्षाला सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. त्यानंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दुहेरी धक्का बसण्याची शक्यता आहे.
धीरज शर्मा हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी मी धीरज शर्मा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या सर्व पदांमधून स्वत:ला मुक्त करतो आहे, अशी पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहिताना राष्ट्रवादी पक्षाच्या फेसबुक पेजला, शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना धीरज शर्मा यांनी मेन्शन केलं आहे.त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .दरम्यान त्यांनी आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जरी राजीनामा दिला असला तरी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या राजीनाम्यानंतर धीरज शर्मा आणि सोनिया दुहन या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे . येत्या सोमवारी या दोघांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
दिल्लीतील तरुण वर्गाशी धीरज शर्मा यांचा अधिक संवाद आहे . ते राष्ट्रवादीतील युवा चेहरा आहेत. धीरज शर्मा दिल्लीत राहतात.युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. 2019 ला महाविकास आघाडी अस्तित्वात येत होती. तेव्हा सुरु असलेल्या ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’मध्ये धीरज शर्मा आणि सोनिया दुहन या दिल्लीतील युवा नेत्यांचा मोठा वाटा राहिला. तर सोनिया दुहन या शरद पवारांच्या पक्षातील युवती संघटनेचं राष्ट्रीय नेतृत्व करत होत्या. बराच काळ त्यांनी प्रवक्ते म्हणूनही काम केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सोनिया दुहन या २०१९ च्या राजकीय घडामोडीनंतर चर्चेत राहिल्या आहेत . शरद पवारांच्या विश्वासू म्हणून त्या ओळखल्या जातात. मात्र आता शरद पवार यांचे हे दोन युवा शिलेदार त्यांची साथ सोडत असल्याने त्यांना मोठा धक्का बसणार आहे .