महाराष्ट्र ताज्या बातम्या

आगरी – कुणबी मतदार ठरवणार भिवंडीचा खासदार

पाटील, म्हात्रे, सांबरे यांची सर्व भिस्त जातीवरच

X: @ajaaysaroj

जाता जात नाही ती जात, असे नेहमीच म्हंटले जाते. पुरोगामीत्वाचे ढोल पिटणारे बहुतांश राजकीय पक्ष जातीचे राजकारण खेळण्यात जास्त पुढे असतात हे महाराष्ट्र गेली दोन दशके प्रामुख्याने बघत आलाय. भिवंडी मतदारसंघात देखील याच जातीच्या समिकरणांमुळे उमेदवारांच्या तोंडाला फेस आलाय. जवळपास वीस लाखाच्या मतदारसंघात आगरी व कुणबी समाजाचे मतदान खूप मोठ्या प्रमाणात असून महायुतीचे कपिल पाटील, आघाडीचे सुरेश म्हात्रे हे आगरी समाजाचे आहेत तर वंचितच्या पाठिंब्यावर उभे असलेले निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे हे मतदान कितपत कोणाकडे जाते यावर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल ते निश्चित होणार आहे, शिवाय मुस्लिम मतदार देखील या विजयात मोठी भूमिका बजवणार आहेच.

चार महिन्यांपूर्वीच ठाण्यातील एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचे ठणकावून सांगत शरद पवारांना टार्गेट केले होते. तर आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची घोषणा करताना प्रसिद्ध केलेल्या यादीत, डॉ प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने प्रत्येक उमेदवारा समोर त्याच्या जातीचा उल्लेख, जातीचे महत्व आणि गणित अधोरेखित करून आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

भिवंडी मतदारसंघात सध्या कपिल पाटील हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. ते ज्या आगरी समाजातून येतात त्या समाजाचे इथे जवळपास सव्वा तीन ते साडे तीन लाखाच्या घरात मतदान आहे. सातत्याने निवडणुकीच्या रिंगणात फक्त तिकीट मिळवण्यासाठी पक्ष बदलण्यात तरबेज असणारे सुरेश म्हात्रे हे देखील आगरी समाजातूनच येतात. राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना आणि आता परत तिकीट मिळावे म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गट असे सगळे पक्ष ते फिरून आले आहेत. या निवडणुकीत जर ते पराभूत झाले तर चार महिन्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत परत तिकीट मिळाले नाही तरी देखील ते शरद पवार गटात थांबतील याची खात्री ते स्वतः ही देऊ शकणार नाहीत. पक्ष बदला तिकीट मिळवा, हीच सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांची ओळख आहे असे मतदारसंघात बोलले जाते. तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे ज्या कुणबी समाजाचे आहेत, त्या समाजाचे येथील मतदान हे जवळपास सात लाखाच्या घरात आहे. त्या शिवाय इथे मुस्लिम मतदार ही जवळपास चार लाखाच्या घरात आहे. निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी प्रामुख्याने या तीन समाजाची मतं जास्तीतजास्त कोण मिळवू शकतो यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघांचा निकाल अवलंबून आहे.

या लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख हे भिवंडी पूर्वमधून निवडून आलेले एकमेव आमदार महाविकास आघाडी बरोबर आहेत. तर शहापूरमधून दौलत दरोडा राष्ट्रवादी अजित पवार गट, भिवंडी ग्रामिणमधून शांताराम मोरे व कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे दोन तर मुरबाडमधून किसन कथोरे व भिवंडी पश्चिममधून महेश चौगुले हे भाजपचे दोन आमदार असे पाच आमदार महायुतीच्या बरोबर आहेत.

शहापूर व मुरबाड या मतदारसंघात कुणबी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. तसाच तो काही प्रमाणात भिवंडीच्या तीनही मतदारसंघात देखील आहेच. आगरी मतदारांचे प्रमाण देखील जसे भिवंडी तालुक्यात आहेच, तसेच ते शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिममधील ग्रामीण पट्ट्यात देखील आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर फरक पाडू शकणारा मुस्लिम समाज देखील भिवंडीमध्ये आणि शहापूर, वासींद, कल्याणचा खाडीपट्टीचा भाग, बदलापूर, मुरबाड या ठिकाणी आहे. यातील आगरी समाजाची बहुतांश मतं ही कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यात विभागली जातील तर थोडयाफार प्रमाणात निलेश सांबरे यांना मिळतील. कुणबी समाजाची जास्तीत जास्त मतं ही सांबरे यांच्या पदरात पडण्याची शक्यता असून काही प्रमाणातच ती पाटील व म्हात्रे यांना पडतील. मुस्लिम समाजाची मतं ही अत्यंत नगण्य प्रमाणात भाजपचे कपिल पाटील मिळवतील, पण सांबरे आणि म्हात्रे यांच्यापैकी कोण जास्त मिळवतो त्यावर बरेच गणित अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मुस्लिम एकगठ्ठा मते म्हात्रे मिळवू शकले तर विजयी उमेदवार आणि दोन नंबरचा उमेदवार यात काट्याची टक्कर होईल.

मुरबाड मतदारसंघात किसन कथोरे हे, कपिल पाटील यांना कितपत मदत करतात याबाबत देखील शंका घेतली जात आहे. बदलापूरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही पॉकेट्स आहेत, ते भाजप म्हणून पाटील यांना मतदान करतील हे मात्र नक्की. कल्याण शहरातून मात्र भाजपला खूप मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, अर्थात हे मतदान कपिल पाटील यांच्यापेक्षा जास्त भाजपला असेल. इथेही संघ आणि भाजपचा पारंपरिक मतदार आहे. येथील ग्रामीण पट्ट्यात असणारा आगरी मतदार हा म्हात्रे यांच्या पदरात किती मत टाकतो हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. उबाठा गट इथे चांगल्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या म्हात्रे यांना मते मिळवून देऊ शकतो. सांबरे यांना मात्र इथे जास्त मतं मिळण्याची शक्यता कमीच आहे.
त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक महायुती, महाविकास आघाडी व अपक्ष यांच्यात जरी होत असली तरी चार जूनला विजयाची माळ ज्याच्या गळ्यात पडेल त्याला जातीचाच आधार लाभलेला असेल हे निश्चित.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात