पुणे : बुधवारी इंदापूर निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांनी जीभ सैल सुटल्याचा प्रकार पाहायला मिळाला. या सभेदरम्यान अजित पवारांनी अनेक वादग्रस्त विधानं केली, यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी इंदापूर तालुक्यात अनेक मेळावे घेतले. डॉक्टर, व्यापारी, वकील यांचे स्वतंत्र मेळावे घेण्यात आले. यावेळी भाषण करताना ते म्हणाले…
१ आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल, परंतू फायदा झाल्यानंतर आम्हाला विसरू नका, विकासकामांसाठी आम्ही हवा तेवढा निधी देऊ, मात्र पाहिजे तेवढा निधी देतो त्याचप्रमाणे मतदान यंत्राची बटणं कचा कचा दाबा, म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल.
२ रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या मनात काय आहे, हे विचारा. त्यांनी आमचं नाव घेतलं तर चांगली वागणूक द्या, दुसऱ्याचं नाव घेतलं तर असं इंजेक्शन टोचा की… असं म्हटल्यानंतर त्यांनी माफी मागितली आणि आपल्याला असं काही म्हणायचं नसल्याचं सांगितलं.
३ काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 790 पर्यंत घसरल्याचं पाहता यापुढे द्रौपद्रीप्रमाणे विचार करावा लागेल की काय, असा प्रश्न पडतो. ते पुढे म्हणाले हा गंमतीचा भाग झाला. मला कुणाचा अपमान करायचा नाही.
त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मुलांची जन्मदर घटल्यास द्रौपदीसारखी स्थिती होईल, हे वक्तव्य राज्यातील महिलांचा अपमान करणारं असल्याची टीका शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली. आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर त्यांना नोटीस पाठवणार का, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.