मुंबई – अंधेरीतील बहुप्रतिक्षित गोखले पुलाचा दुसरा टप्पा रविवारी संध्याकाळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते, स्थानिक आमदार अमीत साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या प्रकल्पाच्या जलद पूर्णतेचे श्रेय आमदार साटम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला दिले जात आहे.
गोखले पूल – बीएमसीचा सर्वात जलद पूर्ण झालेला प्रकल्प
यावेळी बोलताना आमदार अमीत साटम म्हणाले, “गोखले पूल हा अलीकडच्या काळात बीएमसीने सर्वात वेगाने पूर्ण केलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. पूल बंद झाल्यानंतर केवळ १५ महिन्यांत त्याचा एक भाग आणि २८ महिन्यांत संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे, विशेषतः कारण हा पूल सक्रिय रेल्वे मार्गावर बांधण्यात आला.”
मुंबईकरांसाठी विकासाचा ‘आशीर्वाद’
“गोखले पुलासारखी विक्रमी कामगिरी भविष्यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी मुंबईकरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत,” असे भावनिक आवाहन आमदार साटम यांनी उपस्थितांना केले.
’गोखले पूल – एक यशाची गाथा’ पुस्तक व्हावे – आशिष शेलार यांची सूचना
उद्घाटनप्रसंगी मंत्री आशिष शेलार यांनी हा पूल म्हणजे भविष्यातील मुंबईच्या वेगवान विकासाची झलक असल्याचे नमूद केले. “हा प्रकल्प इतक्या जलद पूर्ण झाल्यामुळे, ‘गोखले पूल – एक यशाची गाथा’ असे पुस्तक आमदार साटम यांनी लिहावे,” अशी सूचनाही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील बीएमसीवर टीका
आमदार साटम यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, २०१८ मध्ये पुलाचा भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतरही, बीएमसीच्या तत्कालीन नेतृत्वाखाली तब्बल २० महिन्यांचा विलंब झाला. “मार्च २०२० मध्येच कामाचे आदेश देण्यात आले, मात्र प्रत्यक्ष बांधकाम नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू झाले. रेल्वे ट्रॅकवरील बांधकामाचे जबाबदारी कोणाची, याबाबतही गोंधळ होता,” अशी टीका त्यांनी केली.
सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वेग मिळाला
नोव्हेंबर २०२२ मध्ये साटम यांनी प्रकल्पस्थळी भेट देत स्थितीचा आढावा घेतला. बीएमसीने नियुक्त केलेल्या सल्लागाराने सादर केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पुलाची अवस्था धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर साटम यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे तातडीने पूल बंद करण्याची मागणी केली. नोव्हेंबर २०२२ मध्ये पूल बंद करण्यात आला.
त्यानंतर, उपनगरमंत्री मंगल प्रभात लोढा, बीएमसी व रेल्वे यांच्या संयुक्त बैठकीत पुनर्बांधणी आराखडा ठरवण्यात आला. जानेवारी २०२३ मध्ये जुना पूल पाडण्याचे काम सुरू झाले आणि मार्च २०२३ मध्ये नवीन पुलाचे काम सुरू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दोन वेळा स्थळाला भेट दिली.
फेब्रुवारी २०२४ मध्ये एक भाग खुला, आता पूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला
२६ फेब्रुवारी २०२४ रोजी पूलाचा एक भाग वाहतुकीसाठी खुला झाला आणि आता दुसरा भागही पूर्ण झाल्याने गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार साटम यांनी दिली.