ताज्या बातम्या विश्लेषण

खाजगी सर्वेक्षणाचा अहवाल; बंडखोर शिंदे गटातील आमदारांना जनता नाकारेल?

Twitter : @milindmane70

मुंबई

राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर मतदारसंघातील जनता कोणाच्या बरोबर असेल याची चिंता शिंदे गटातील आमदारांना लागली आहे. शिंदे गटातील बहुतांशी आमदारांकडून मतदारसंघात खाजगी संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणात या बंडखोर आमदारांना जनतेने कौल नाकारल्यानचे निकाल येत असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये कमालीचे नैराश्य आले असून या चिंतेने शिंदे गटातील आमदारांना ग्रासले आहे.

शिवसेना पक्षात बंडखोरी करून पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडून येणे फक्त नारायण राणे यांच्यासोबत गेलेल्या मुंबईतील नायगाव विधानसभा मतदारसंघातील कालिदास कोळंबकर यांनाच शक्य झाले आहे. त्यानंतर यापूर्वी शिवसेनेत असलेले छगन भुजबळ व नारायण राणे यांची सोबत केलेल्या आमदारांची जी गत झाली, तीच वेळ आता आपल्यावर येऊन ठेपली आहे, अशी भीती शिंदे गटातील आमदार खाजगीत व्यक्त करत आहेत.

सत्ता, संपत्ती व पैशाच्या जोरावर केलेल्या विकास कामांचे पैसे सरकारकडे अडकल्याने मूळ शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटातील आमदारांसोबत आहेत. मात्र, निवडणुका लागल्यानंतर हेच पदाधिकारी आपल्याबरोबर राहतील की नाही याची शाश्वती शिंदे गटातील आमदारांना नसल्याने शिंदे गटातील अनेक आमदार चिंताग्रस्त झाले आहेत.

शिवसेना पक्षातून बंडखोरी केल्यानंतर जवळपास दीड वर्षाहून अधिक कालावधी उलटला. मात्र, अजूनही शिंदे गटातील आमदारांसोबत असणारे शिवसेनेचे पदाधिकारी यांची नाळ भाजपा व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जुळत नसल्याने शिवसेनेचे अनेक मूळ पदाधिकारी शरीराने शिंदे गटाबरोबर तर मनाने उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेबरोबर असल्याचे अनेक पदाधिकारी खाजगीत सांगत आहेत.

लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेची निवडणूक लागली तर आपल्या मतदारसंघात काय परिस्थिती असेल याची चिंता शिवसेना पक्षाच्या चिन्हावर आजपर्यंत तीन वेळा निवडणूक लढून जिंकलेल्या शिंदे गटातील आमदारांना लागली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांनी खाजगी संस्थेमार्फत आत्तापर्यंत तीन वेळा मतदार संघात सर्वेक्षण करून घेतले. या तिन्ही सर्वेक्षणात मतदारांनी शिंदे गटातील आमदारांना स्पष्टपणे नाकारल्याचा अहवाल या खाजगी सर्वेक्षण यंत्रणेंनी दिल्याने शिंदे गटातील आमदार चिंताग्रस्त आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडखोरी करून त्यांच्या समवेत गेलेले बहुतांश आमदार शिवसेनेच्या तिकिटावर तीन वेळा निवडून आलेले आहेत. यापूर्वी मतदारसंघातील स्थिती अशी होती की, शिवसेना पक्षाच्या आदेशावर शिवसैनिक निवडणुकीसाठी मनापासून काम करीत होता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे की काय, शिंदे गटातील आमदारांनी खाजगी सर्वेक्षण यंत्रणेमार्फत आपापल्या मतदारसंघात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे अहवाल सांगतात की, विद्यमान आमदारांना मतदारांनी नाकारले आहे. आपल्याऐवजी पत्नी अथवा मुलगा याला निवडणुकीत उमेदवारी दिली तर निवडून येईल का? याची देखील चाचणी या खाजगी संस्थेने केली. मात्र सर्वत्र गद्दार म्हणून या आमदारांना विशेषणे देण्यात आली. या आमदारांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना मतदान करणार नाही, गद्दारांना शिवसेनेत थारा नाही, बाळासाहेबांचा कडवट व निष्ठावंत शिवसैनिक या गद्दार आमदार व त्यांच्या नातेवाईकांच्या बरोबर  जाणार नाही, असा अहवाल सर्वेक्षणातून आल्याने शिंदे गटातील आमदारांना चिंतेने ग्रासले आहे.

अनेक आमदार चिंताग्रस्त असून लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक लागली तर आपले काही खरे नाही, या चिंतेने अनेक आमदार कमालीचे भयभीत झाले आहेत. मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली असून आपण पुन्हा निवडून येऊ, असे चेहऱ्यावर उसने हसू आणून ते मतदारांसमोर सद्यस्थितीत जात आहेत.

खाजगी सर्वेक्षण केलेल्या मतदार संघातील आमदारांची नावे पुढीलप्रमाणे;

(1) श्री निवास वनगा (पालघर) (2) महेश शिंदे (कोरेगाव) (3) संदिपान भुमरे (पैठण) (4) अनिल बाबर (खानापूर) (5) शहाजी बापू पाटील (सांगोला) (6) किशोर आप्पा पाटील (पाचोरा) (7) चिमणराव आबा पाटील (एरंडोल) (8) महेंद्र दळवी (अलिबाग)(9) प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद) (10)शंभूराज देसाई (पाटण)(11) ज्ञानराज चौगुले (उमरगा) (12) बालाजी किनिकर (अंबरनाथ) (13) भरत गोगावले (महाड) (14) संजय गायकवाड (बुलढाणा) (15) सुहास कांदे (नांदगाव) (16) प्रकाश आबिटकर (राधानगरी) (17) प्रकाश सुर्वे (मागठाणे) (18) सदा  सरवणकर (माहीम) (19) मंगेश कुडाळकर (कुर्ला) (20) यामिनी जाधव (भायखळा) (21) दिलीप लांडे (चांदीवली) (22) गुलाबराव पाटील (जळगाव) (23) दीपक केसरकर (सावंतवाडी) (24) अब्दुल सत्तार (सिलोड) (25) महेंद्र थोरवे (कर्जत) (26) बालाजी कल्याणकर (नांदेड) (27) लता सोनवणे (चोपडा) (28) तानाजी सावंत (भूम परांडा) (29) योगेश कदम (दापोली) (30) संजय शिरसाठ (औरंगाबाद) (31) संजय राठोड (यवतमाळ )(32) संतोष बांगर (कळमनुरी) (33) उदय सामंत (रत्नागिरी)

शिंदे गटातील आमदारांना वाटाण्याच्या अक्षता?

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून गेलेल्या शिवसेना पक्षातील आमदारांना शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्री, राज्यमंत्री, महामंडळ तसेच राज्य विधान मंडळाच्या समित्यांवर तसेच मतदार संघातील 15 ते 20 वर्षे रखडलेली कामे व जलसंपदा विभागाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे वचन देण्यात आले होते. मात्र मोजक्या आमदारांना मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर बाकीच्यांच्या वाट्याला काहीच आलेले नाही. तसेच येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा तिकीट देऊन निवडून आणण्याचे वचनदेखील देण्यात आले होते. मात्र शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा समावेश झाल्याने शिंदे गटातील शिवसेना आमदार बिथरले आहेत.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी