X: @therajkaran
मुंबई: कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा, असे निर्देश आजच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
मंत्रालयात आज राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम आढावा व सन २०२४-२५ आराखड्यास मान्यता बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले, एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रमात सोयाबीन यापीकाचा २६ जिल्ह्यांत समावेश आहे, तर २१ जिल्ह्यात कापूस पीकांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राबविण्यास गती द्यावी. या कार्यक्रमांसाठी आणखीही निधीची गरज भासल्यास तो निधीही उपलब्ध करून देण्यात येईल, ग्वाहीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
ही योजना समूह आधारित आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना केंदस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापर वाढविण्यासाठी त्यांचा प्रचार व प्रसार करावा. तसेच २०२४-२५ च्या पिक प्रात्यक्षिकांच्या पॅकेजमध्ये सुद्धा नॅनो युरिया व नॅनो डीएपी समावेश करण्यात येणार आहे. देशामध्ये नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरण्यात महाराष्ट्र राज्य एक नंबर बनण्यासाठी विभागाने मिशन मोडवर काम करावे असेही निर्देश दिल्याची माहितीही कृषीमंत्री मुंडे यांनी यावेळी दिली.
यावेळी कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, वित्त विभागाचे सहसचिव डॉ.माधव वीर, कृषीचे उपसचिव संतोष कराड, कृषी आयुक्त कार्यालयाचे संचालक दिलीप झेंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.