X: @therajkaran
पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे (Shiv Sena UBT) गटाच्या भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज आज आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीकडून (MVA) शक्ती प्रदर्शन करण्यात आले. ठाकरे यांनी यावेळी वाढवण बंदर विरोधात जनतेच्या सोबत राहू, असे आश्वासन दिले. पालघर (Palghar Lok Sabha) आणि इतरत्र भाजपकडून अथवा महायुतीकडून उमेदवार जाहीर होत नसल्याकडे लक्ष वेधून आदित्य ठाकरे म्हणाले, एका बाजूला महाविकास आघाडीसोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपला उमेदवार सापडत नाही.
पालघर लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाटेल गेल्याने भाजपकडून (BJP) माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा व माजी आमदार विलास तरे यांची नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येते. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित आहेत. ते ही दरम्यानच्या काळात पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने भाजपकडून सध्या माजी आमदार विलास तरे व हेमंत सावरा यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून उमेदवार जाहीर झाला नसला तरी उद्या 3 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी उमेदवाराचा लोकसभा उमेदवारीचा फॉर्म भरण्यात येणार आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज भरत असताना उबाठा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पालघर लोकसभा निवडणूक आघाडी जिंकणारच, असा आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, वातावरण फार गढुळ होत चालले आहे. आपण पाहिले असेल मुंबई व इतर ठिकाणी महायुती उमेदवार देऊ शकत नव्हते. काल -परवा पर्यंत दिली आहेत. यातून चित्र स्पष्ट आहे, एका बाजूला महाविकास आघाडी सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपला उमेदवार सापडत नाही,अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
ते म्हणाले, घाणेरडी वृत्ती लोकांसमोर आली आहे. घाणेरडे राजकारण आणि एवढे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात आणि देशात झाले ते आपण पाहत आहोत. भाजपा नोटाबंदी, जीएसटी, पंधरा लाखाचे खाते, प्रधानमंत्री आवास योजना, यावर बोलायला तयार नाहीत. नेमके भाजपने देशासाठी व महाराष्ट्रासाठी केले काय हे बोलायला तयार नाही, असा आरोप त्यांनी केला. 2 मे 2024 रोजी भारती भरत कामडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), यांनी 2 अर्ज, भरत सावजी वनगा (बहुजन समाज पार्टी), राहुल भगवान मेढा (मार्क्सवादी लेनिन पार्टी), मोहन बारकू गुहे (भारत आदिवासी पार्टी), कल्पेश बाळू भावर (अपक्ष), वासंती शंकर झोप (अपक्ष), सुरेश गणेश जाधव (अपक्ष), दिनकर दत्तात्रय वाढाण (अपक्ष) या उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत एकूण 11 उमेदवारांनी 13 नामनिर्दशनपत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिले.